गेल्या तीन महिन्यांपासून तिहारच्या तुरुंगात असणा-या सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या नजरकैदेची याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळत त्यांचा तुरुंगवास आणखी लांबवला.
नवी दिल्ली – गेल्या तीन महिन्यांपासून तिहारच्या तुरुंगात असणा-या सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या नजरकैदेची याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळत त्यांचा तुरुंगवास आणखी लांबवला. मात्र त्यांच्या सुटकेसाठी आवश्यक पैशाची तजवीज करण्यासाठी समूहाला मालमत्ता विक्रीची परवानगी देताना किंचित दिलासा दिला.
न्या. टी. एस. ठाकूर आणि ए. के. सिक्री यांनी या प्रकरणी सुनावणी केली. नजरकैदेची मागणी फेटाळण्यात आल्याचा निर्णय या खंडपीठाने दिला असला तरी सुब्रतो रॉय यांच्या सुटकेसाठी आवश्यक ५००० कोटी रुपये आणि तेवढीच बँक गॅरंटी मिळवण्यासाठी देशातील ९ शहरांमधील स्थावर मालमत्ता विक्री करण्यास परवानगी दिली आहे. या मालमत्तेची बाजारभावापेक्षा कमी किमतीत विक्री करता येणार नाही. तसेच खरेदीदार कंपनीशी संबंधित नसावा, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे.
मालमत्ता विक्रीतून मिळणारे पैसे हे सेबीकडून नियंत्रित स्वतंत्र बँक खात्यामध्ये ठेवावे लागणार आहेत. त्यानंतरच खरेदीदाराला मालकीविषयक कागदपत्रे दिली जाणार असल्याचेही खंडपीठाने म्हटले आहे. सहारा समूहाच्या मुदतठेवी आणि बाँड यांच्यावरील बंदीही उठवण्यात आली आहे. दरम्यान, बँक गॅरंटीसाठी पुण्यातील अॅम्बी व्हॅलीतील मालमत्ता तारणाला परवानगी दिली आहे. मात्र राष्ट्रीय किंवा शेडय़ुल्ड बँकेचीच गॅरंटी ग्राह्य धरली जाईल. सहकारी बँकेने दिलेली गॅरंटी ग्राह्य मानली जाणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.