लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या अकरा महिन्यांत केलेल्या कारवाईत ५३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
ठाणे– लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या अकरा महिन्यांत केलेल्या कारवाईत ५३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात ६७ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत वर्ग एकच्या पाच अधिका-यांचा समावेश आहे.
सर्वाधिक ११ लाचखोर महसूल विभागातील आहेत. विशेष म्हणजे न्याय व विधी विभागातील एका लाचखोर अधिका-याचा यात समावेश आहे. एक जानेवारी ते १८ नोव्हेंबरदरम्यान करण्यात आलेल्या कारवाईत वर्ग एकचे पाच अधिकारी, वर्ग दोनचे नऊ, वर्ग तीनचे ४४, वर्ग चारचे पाच तसेच सहा खासगी व्यक्तींचाही समावेश आहे. वर्ग एकच्या अधिका-यांमध्ये कर्जतच्या तहसीलदाराचा समावेश आहे.
लाखो रुपयांची लाच स्वीकारताना त्याला अटक करण्यात आली होती. तपासात त्याच्याकडे १११ तोळे सोने व रोख रक्कम मिळाली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत न्याय व विधी विभाग- १, महसूल- ११,पोलिस-१५,एमएसईबी-३, महानगरपालिका-५, जिल्हा परिषद- ६, भूमी अभिलेख- २, आरोग्य-१, कामगार विभाग- १, राज्य उत्पादन शुल्क विभाग-३, समाज कल्याण- १, कृषी-२, कारागृह-१ व खादी व ग्रामोद्योग विभागातील एका कर्मचा-याचा समावेश आहे.