बॉलिवुडमध्ये येण्यासाठी अनेक जण धडपडत असतात. हीरो होण्यासाठी दररोज देशाच्या कानाकोप-यांतून अनेक तरुण-तरुणी या मायानगरीकडे कूच करतात. त्यातल्या काहींना यश मिळतं, तर काहींना नाही.
बॉलिवुडमध्ये येण्यासाठी अनेक जण धडपडत असतात. हीरो होण्यासाठी दररोज देशाच्या कानाकोप-यांतून अनेक तरुण-तरुणी या मायानगरीकडे कूच करतात. त्यातल्या काहींना यश मिळतं, तर काहींना नाही. बालिवुडमध्ये सतत ननवनीन नायक-नायिकांचा शोध सुरूच असतो. सध्या या नव्या नायकांमध्ये निर्माता कुमार तोरानी यांचा मुलगा गिरीश कुमार याची भर पडली आहे. त्याच्यासोबत आहे श्रुती हसन. प्रभुदेवा दिग्दर्शित ‘रमय्या वस्तावैया’ या चित्रपटातून तो या रुपेरी पडद्यावर चमकणार असून हा रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपट येत्या १९ जुलैला प्रदर्शित होणार आहे.
‘रमय्या वस्तावैया’ हे शब्द अनेक वर्ष भारतीय प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालत आहेत. राज कपूर यांनी आपल्या एका चित्रपटातल्या गीताने अजरामर केलेलं हे गाणं प्रत्येक अंताक्षरीचा अविभाज्य भाग आहे. अनेकांना हे शब्द रशियन वाटतात. मात्र हे तमिळ भाषेतील शब्द असून त्यांचा अर्थ ‘राम परत आलाय’ असा आहे. याच शीर्षकाने तमिळमध्ये गाजलेल्या सिनेमाचा हा रिमेक आहे. राम नावाच्या एनआरआय मुलाची भूमिका गिरीश कुमारने साकारली आहे.
सुरुवातीला कमल हसनची मुलगी एवढीच ओळख असलेल्या श्रुतीनं टॉलिवुड आणि बॉलिवुडमधील अनेक चित्रपटांत काम करून स्वत:ची अशी खास ओळख निर्माण केली आहे. दोघांच्याही घरात चित्रपटाचं वातावरण. कमल हसन ज्येष्ठ निर्माता, दिग्दर्शक तर कुमार तोरानी यांची ओळखही अनेक यशस्वी व भव्य-दिव्य सिनेमांचे निर्माते म्हणून प्रसिद्ध आहे. श्रुती त्या मानानं या क्षेत्रात बरीच रुळलेली आहे.
‘लक’,‘दिल तो बच्चा है जी’ या दोन चित्रपटांचा तिला अनुभव आहे. ‘लक’ या तिच्या पदार्पणातल्या चित्रपटानं विशेष यश संपादन केलं नसलं तरी एक चांगली अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. तिला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.मात्र पदार्पणाची गिरीशला थोडीफार भीती आहे, ते साहजिकच आहे. प्रेक्षक, विशेषकरून तरुण मुली आपल्याला कशा स्वीकारतील याकडे त्यानं विशेष लक्ष दिलंय. सलमान व हृतिक हे आवडते नायक असलेला गिरीश आता रणबीर, इमरानसारख्या चॉकलेट हीरोंच्या पंक्तीत बसायला सिद्ध झालाय.
‘रमय्या वस्तावैया’ या चित्रपटातील राम परदेशात शिक्षण घेऊन गावी परतलेला असून तो थोडा मस्तीखोर, गोंडस आणि मित्रांचा लाडका आहे. तो मनापासून एका मुलीवर प्रेम करतो आणि प्रेमासाठी तो काहीही करू शकतो. सोना (श्रुती) या आपल्याच दुनियेत जगणा-या, छोटय़ा गावातल्या भोळ्या-भाबडय़ा मुलीची भूमिका श्रुती साकारणार आहे. त्या दोघांचं प्रेम हा या चित्रपटाचं बलस्थान (यूएसपी) आहे. प्रेम मिळवण्याची त्यांची धडपड आपल्याला या चित्रपटातून दिसणार आहे.
या चित्रपटातली त्याची एण्ट्रीच सर्फिग करतानाची आहे.
आतापर्यंत विमानातून, गाडय़ांमधून किंवा इतर वाहनांतून अनेकांनी या रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. मात्र गिरीश चक्क सर्फिग करतच आपल्यासमोर येणार आहे. सर्फबोर्डवरून अंगावर लाटा घेत समुद्रात केलेल्या कसरती म्हणजे सर्फिग! मात्र गिरीशसाठी ते काही सोप्पं नव्हतं. त्यासाठी त्यानं खास सर्फिग शिकून घेतलं. आपल्या भूमिकेच्या सर्वच पैलूंचा त्याने अभ्यास केला आणि गेली तीन वर्ष त्यावर प्रचंड मेहनत घेतली.
गिरीशचं पदार्पण केवळ निर्मात्याचा मुलगा म्हणून झालेलं नाही. तर त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. या माध्यमाचं तंत्र शिकून घेण्यासाठी त्यानं सुरुवातीला पडद्यामागं राहून बरंच काम केलं आहे. या माध्यमातील प्रत्येक कष्टाची त्याने ओळख करून घेतलीय. या अनुभवानंतरच वयाच्या तेवीसाव्या वर्षी त्यानं या चित्रपटात पदार्पण केलं. भूमिकेसाठी स्वत:ची इमेज तयार करताना त्याने नृत्यदेखील शिकून घेतलं. तोरानी यांनी जेव्हा प्रभुदेवा यांच्याकडे या चित्रपटाचं दिग्दर्शन सोपवायचं ठरवलं तेव्हा गिरीशला अभिनय शिकायला पाठवू का, असंदेखील तोरानी यांनी प्रभुदेवा यांना विचारलं होतं.
प्रभुदेवा यांनी गिरीशची ऑडिशन घेतली. त्याला डान्सच्या सरावासाठी पंचवीस गाणी दिली होती. विशेष म्हणजे, त्याच्यासाठी कोरिओग्राफरसुद्धा गिरीशला प्रशिक्षित करत होते. आता प्रभुदेवा यांच्यासारखे नृत्यनिपुणच दिग्दर्शन करतायत असं म्हटल्यावर डान्स तर त्याला परफेक्ट लागणारच. या ऑडिशनमध्ये तो पास झाला. सिद्धिविनायकाला पायी जात असताना त्याचं सिलेक्शन झाल्याची बातमी त्याला प्रभुदेवा यांनी फोनवरून सांगितली. त्याच्यासाठी बॉलिवुडच्या एण्ट्रीचा मार्ग मोकळा झाला.
आपल्या या एण्ट्रीचं क्रेडिट त्यानं त्याचे पप्पा व गणपतीबाप्पा यांना दिलं. या संधीचं त्याने सोनं करून दाखवलं. आपल्या या भूमिकेसाठी गिरीशनं जबरदस्त मेहनत घेतलीय. नायकाच्या दृष्टीनं त्याचं वजन फार होतं. ते घटवण्यासाठी त्याला बरीच मेहनत घ्यावी लागली. त्यासाठी त्याला चिझकेक, पिझ्झा, गाजरचा हलवा हे आवडते पदार्थ वज्र्य करावे लागले. चित्रीकरणादरम्यान कधी हे पदार्थ खाण्याचा मोह झाला तर त्यासाठी त्याला दुप्पट मेहनत करावी लागायची. त्याच्या बॉडीबिल्डिंगच्या प्रशिक्षणासाठी खास दक्षिण आफ्रिकेतून प्रशिक्षकांना बोलावण्यात आलं होतं. थोडक्यात, या क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी जे जे करायचं आहे ते ते त्याने मोठय़ा भक्तिभावानं केलंय.
श्रुती साकारत असलेली सोना ही फार वेगळी आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वापेक्षा ही संपूर्णपणे वेगळी अशी भूमिका आहे. या चित्रपटात ती गावातली एक साधीभोळी तरुणी साकारतेय. आपल्या गावाच्या बाहेरही न गेलेल्या या मुलीच्या आयुष्यात एक परदेशी स्थायिक मुलगा येतो. त्याने तिच्या जीवनाचे बदलणारे रंग ती आपल्या अभिनयातून साकारणार आहे. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर किती यश मिळतं हे तिच्यासाठी गौण आहे. चित्रपटाचं यश केवळ अभिनेत्यांवर अवलंबून नसतं, असं ती म्हणते. त्यापेक्षा ती आपलं सर्व लक्ष आपल्या अभिनयावर केंद्रित करते.
गिरीशनं सावध खेळी करत बॉलिवुडमध्ये प्रवेश केलाय. दक्षिणेत गाजलेल्या चित्रपटाचा रिमेक त्याने पदार्पणासाठी निवडला. प्रभुदेवा यांच्यासारखा दिग्दर्शक, त्याचबरोबर संपूर्ण परिवारानं एकत्र पाहावं, असं कथानक. त्यामुळे त्याला यशाची खात्री आहे. आपला चित्रपट प्रेक्षकांनी परिवारासोबत बघावा, असं त्याला मनापासून वाटत होतं, त्यामुळे अॅक्शन हीरोपेक्षा चॉकलेट हीरो म्हणून येणंच त्यानं पसंत केलं. दिलदार सलमान खान आणि धक्धक् गर्ल माधुरी दीक्षित हे त्याचे रोल मॉडेल आहेत.
मात्र श्रुतीला अद्याप तिचा रोल मॉडेल गवसला नाही. कोणासारखं बनण्यापेक्षा स्वत:चं स्थान निर्माण करणं तिच्यासाठी महत्त्वाचं आहे, असं ती मानते. तिच्यासोबत काम करण्या-या गिरीशची स्तुती करायला ती विसरली नाही. आपल्या वडिलांच्या चित्रपटात तू कधी दिसणार, या प्रश्नावर श्रुती मात्र अनुत्तरीतच राहिली. आता वडिलांना तिचं काम आवडलं नाही की ती वडिलांसोबत काम करायला ती स्वत:च उत्सुक नाही, याचा उलगडा काही झाला नाही.