टिटवाळा रेल्वे स्थानक रोडवर मुख्य बाजारपेठेत आसणा-या विघ्नहर्ता ज्वेलर्सच्या मालकाला महिला चोरांच्या त्रिकुटाने गंडा घातला होता.
टिटवाळा – टिटवाळा रेल्वे स्थानक रोडवर मुख्य बाजारपेठेत आसणा-या विघ्नहर्ता ज्वेलर्सच्या मालकाला महिला चोरांच्या त्रिकुटाने गंडा घातला होता. त्या वेळी त्यांनी तेराशे ग्रॅमचे चांदीचे दागिने लांबवले होते. त्यांना जेरबंद करण्यास अखेर टिटवाळा पोलिसांना यश आले आहे.
टिटवाळा मुख्य बाजारपेठेतील गणेश मंदिर रोडवर असणा-या विघ्नहर्ता ज्वेलर्सच्या दुकानात चांदीचे पैंजण खरेदी करण्यासाठी तीन महिला २५ फेब्रुवारी २०१४ रोजी सकाळी दहा वाजता आल्या होत्या. दोन महिला अगोदर दुकानात शिरल्या व इतर बाहेर उभ्या राहिल्या होत्या. अशा प्रकारे या महिला सराफाच्या दुकानात सात ते आठ जणी मिळून येत असत.
यातील काही जणी दुकानदाराला बोलण्यात गुंग करायच्या, तर सोबत असलेल्या इतर हात साफ करायच्या, अशी यांची चोरी करण्याची पद्धत आहे. विघ्नहर्ता ज्वेलर्समध्येही याच प्रकारे जवळजवळ तेराशे ग्रॅमचे चांदीचे पैंजण लांबवून पोबारा केला होता.
अखेर तीन महिन्यांनंतर पुन्हा एखाद्या सराफास गंडवण्याच्या इराद्याने त्या काल टिटवाळ्यात दाखल झाल्या होत्या. विघ्नहर्ता ज्वेलर्सचे मालक निखिल बागल यांची त्यांच्या संशयास्पद हालचालीवर नजर पडताच त्यांनी टिटवाळा पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी सापळा रचून अखेर तिघींना जेरबंद केले. यात त्यांच्या आणखी साथीदार असण्याचा पोलिसांना दाट संशय आहे. टिटवाळा पोलिस सहा. पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करत आहेत.