कल्याण-शीळ रस्त्यावरील मार्बल कारखाना तोडण्याची कारवाई केल्याप्रकरणी गोळवली गावचे सरपंच गणपत गायकर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली – कल्याण-शीळ रस्त्यावरील मार्बल कारखाना तोडण्याची कारवाई केल्याप्रकरणी गोळवली गावचे सरपंच गणपत गायकर, ग्रामसेवक ए. के. इंगवलेद, ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला गायकर, हनुमान गायकर, सूर्यकांत, गोविंद, नंदू म्हात्रे, महेश म्हात्रे, पुंडलिक म्हात्रे, शिवाजी शेंदूलकर, सुरेश वाघ, संभाजी सुळे, रामविलास राजभर यांच्यासह ७० जणांविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दावडी नाक्यावर सुप्रीम मार्बल ग्रेनाइट कारखाना आहे. हा कारखाना बेकायदा असल्याची नोटिस गोळवली ग्रामपंचायतीने बजावली होती. मात्र कारखान्याचे मालक लक्ष्मण सिंग श्रीमान यांनी या नोटिशीला उत्तर पाठवले होते.
मात्र ग्रामपंचायतीने ते स्वीकारले नाही. रस्ता काढण्यासाठी कारखाना तोडण्याची कारवाई करण्यात आली.
या वेळी कारखान्याचे मालक श्रीमान यांचे ३२ लाखांचे नुकसान झाले. तसेच १ लाख रुपये किमतीच्या मालाची चोरी झाली. या प्रकरणी श्रीमान यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यानुसार न्यायालयाने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.