१ कोटी ७२ लाख १७ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून या प्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
खेड- कोकणातील ६८ जणांना बांधकाम खाते, आरोग्य खाते व तलाठी म्हणून नोकरीस लावतो, असे सांगून खोटे नेमणूक पत्र देत १ कोटी ७२ लाख १७ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून या प्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिलह्यातील वाळवा तालुक्यातील वाटगाव येथे राहणारे संशयित सचिन हंबीरराव पाटील व त्यांचा साहाय्यक हेमंत हनुमंतराव पाटील (रा. एढेमच्छिंद्र, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी २०१२ ते १६ मार्च २०१४ या कालावधीत कोकणातील ६८ जणांना कोटय़वधी रुपयांना फसवल्याची तक्रार राजेश कृष्णा मोरे यांनी खेड पोलीस ठाण्यात दिली आहे.
राजेश मोरे हे खेड शहरातील योगिता दंत महाविद्यालयात लिपिक म्हणून तात्पुरत्या स्वरूपात कामाला आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे चिंचघर वेताळवाडी येथे राहणा-या प्रशांत सावंत या परिचितांनी जानेवारी २०१४ मध्ये सचिन हंबीरराव पाटील (रा. वाटेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा सचिव असून त्याची ओळख असल्याचे सांगितले.
बांधकाम विभागात क्लार्क म्हणून काम करायचे असेल तर मी त्यांना बोलतो. मात्र त्यांना तुला ३ लाख रुपये द्यावे लागतील असे मोरे यांना सांगितले. सावंतवर विश्वास ठेवून १५ जानेवारी २०१४ रोजी सावंत यांच्या घरी जाऊन शिक्षणाची कागदपत्रे व १ लाख ५० हजार रुपये रोख दिले. मार्च २०१४मध्ये सावंत याने मोरे व इतर मुलांची सचिन पाटील व हेमंत पाटील यांच्याशी भेट केली. त्यावेळी सचिन पाटील व हेमंत पाटील यांनी उर्वरित १ लाख ५० हजार रुपये रक्कम नेमणूक पत्र मिळाल्यानंतर देण्यास सांगितले.
त्यानंतर १० मार्च २०१४ रोजी प्रशांत सावंत यांनी संपर्क साधून बांधकाम विभागाचे नियुक्तीपत्र आल्याचे सांगितले. त्या दिवशी सावंत यांच्या घरी जाऊन रुपये १ लाख ५० हजार देऊन नोकरीचे नियुक्तीपत्र घेतले. १५ मार्च २०१४ रोजी सावंत यांनी फोन करून १६ रोजी सचिन पाटील व हेमंत पाटील वेरळ येथील विवेक कदम यांच्या घरी येणार असल्याचे सांगून तेथे नियुक्तीपत्र आणण्यास सांगितले.
सचिन पाटील व हेमंत पाटील यांना भेटण्यासाठी मोरे गेले असता तेथे खेड, दापोली, चिपळूण तालुक्यातील रहिवासी असलेले अनेक तरुण दिसले. त्यांच्याकडूनही नोकरीला लावतो असे सांगून एकूण १ कोटी ६९ लाख १७ हजार रुपये रक्कम घेतल्याची बाब मोरे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केली आहे. त्यानंतर सचिन पाटील आणि हेमंत पाटील यांनी मंत्रालयातून काही तांत्रिक बिघाड झाल्याने नियुक्तीची तारीख पुढे जाणार असल्याचे सांगत दिलेली नियुक्तीपत्रे पुन्हा जमा करण्यास सांगितली.
तसेच मंत्रालयात तुमच्या नोकरीचे काम चालू आहे, पुढील काही दिवसात काम होईल, तुम्ही पैशाची काळजी करू नका. तुम्हाला नोकरी नाही लावली तर मी तुमचे पैसे व्याजासह परत देईन, असा विश्वास दिला. परंतु त्यानंतर सचिन पाटील अथवा त्याचा साहाय्यक हेमंत पाटील याचा संपर्क होत नसल्याने फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर राजेश मोरे यांनी त्यांच्या विरोधात २८ मे२०१६ रोजी खेड पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.