समीर गायकवाडची प्रेयसी ज्योती कांबळे हिला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याचा मित्र आणि या प्रकरणातील दुस-या संशयित आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके तयार केली.
मुंबई- कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या समीर गायकवाडची प्रेयसी ज्योती कांबळे हिला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची खात्रीलायक माहिती असून त्याचा मित्र आणि या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी रुद्र पाटील याच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके तयार केली.
‘सनातन’च्या गोवा येथील आश्रमात असणा-या समीरच्या डॉक्टर पत्नीच्या चौकशीसाठी एक पथक गोव्याला रवाना झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
समीरला अटक करून कोल्हापूरला नेल्यानंतर त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. पोलिसांनी गुरुवारी समीरच्या सांगलीतील घरी छापा मारल्यावर २३ मोबाईल आणि एक मोठा चाकू हाती लागला आहे.
नवी मुंबईत राहणारी समीरची प्रेयसी ज्योती कांबळे हिला पोलिसांनी अटक केल्याची खात्रीलायक माहिती असून तिच्या सहाय्याने या प्रकरणातील दुसरा आरोपी रुद्र पाटील याच्या अटकेसाठी प्रयत्न करीत आहेत. समीरकडे सापडलेल्या २३ मोबाईलच्या सीडीआरचा डेटा तपासण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.
समीपर्यंत पोहोचण्यात मोबाईलवरील त्याचे संभाषण पोलिसांना उपयोगी पडेल. समीरकडील वेगवेगळया फोनचे कॉल रेकॉर्ड तपासले असता समीर गोवा येथील स्फोटात ठार झालेला मलगोंडा पाटील आणि रुद्र पाटील याच्या कायम संपर्कात असल्याचे स्पष्ट होते.
मलगोंडा पाटलाच्या मृत्यूनंतर रुद्र पाटील आणि ज्योती कांबळे यांच्या संपर्कात समीर अनेक वेळा आल्याचे कॉल रेकॉर्डवरून स्पष्ट झाले.
मोबाईलवर झालेल्या संभाषणात अधिक स्पष्टता आणण्यासाठी व्हाईस सॅम्पल गुजरातच्या फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात येणार आहेत. यापूर्वी कोल्हापूर सायबर क्राईमच्या पोलिसांनी मोबाईल कॉलचे रेकॉर्ड, डम्प डाटा माध्यमातून घटनास्थळाच्या परिसरात झालेले मोबाईल कॉल, त्यांचे लोकेशन्स तसेच किती कालावधीचे संभाषण झाले याची माहिती जमवली आहे. त्या छाननीतूनच पोलीस गायकवाडपर्यंत पोहोचू शकले.
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर तो कुठे कुठे फिरला, कुणा कुणाच्या संपर्कात होता याचा शोध पोलीस घेत आहेत. समीरच्या आवाजाचे नमुने आता गुजरातमधील गांधीनगर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. यातूनच कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील इतर आरोपींपर्यंत पोहोचू असा पोलिसांना विश्वास वाटतो आहे.
समीरचे हे काम त्याच्या भावाला पसंद नव्हते
‘सनातन’सारख्या कट्टर संस्थेत काम करणे हे समीरचा भाऊ सचिन आणि वहिनी वनिता हिला पसंत नव्हते. वनिता यांनीच ही माहिती पत्रकारांना दिली. समीर आणि त्याची आई शांताबाई हे ‘सनातन’चे प्रचारक म्हणून काम करीत होते.
समीर मोबाईल दुरुस्तीचे काम करायचा; परंतु त्याचे पैसे त्याने कधी घरी दिले नाहीत. त्याची आई शांताबाई वेगवेगळया बचत गटांकडून कर्ज घ्यायच्या आणि ते पैसे ‘सनातन’च्या कामासाठीच वापरत असत. त्याचा भाऊ समीर हा एका खासगी कंपनीत रखवालदार म्हणून काम करतो. त्याला अत्यंत तुटपुंजा पगार मिळत असल्याने घरात खूप ओढाताण होत होती, अशी माहिती वनिता गायकवाड यांनी पत्रकारांना दिली.