विरोधकांनी वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किंमतींच्या मुद्दयावरुन सभागृहात गोंधळ घातल्याने दोन्ही सभागृहाचे कामकाज सोमवारी होऊ शकले नाही.
नवी दिल्ली – विरोधकांनी वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किंमतींच्या मुद्दयावरुन सभागृहात गोंधळ घातल्याने लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
भाजपसह तृणमूल काँग्रेस आणि एडीएमके या विरोधी पक्षांनी पेट्रोलच्या दरवाढीचा निषेध करत किंमती मागे घ्याव्यात अशा घोषणा सभागृहात सुरु केल्या. सकाळी सभागृहाचे कामकाज सुरु होताच सीपीएमचे नेते बसूदेब आचार्य यांनी प्रश्नोत्तराचा तास न घेता पेट्रोलच्या वाढलेल्या किंमती मागे घेण्यासंदर्भात चर्चा करावी अशी मागणी लावून धरली. आचार्य यांनी तशा आशयाचे लेखी निवेदनही लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांना दिले. विरोधकांचा गोंधळ कायम राहिल्याने दुपारी दोन वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले होते. मात्र दोन वाजता कामकाज सुर झाल्यानंतरही गोंधळ कायम राहिल्याने लोकसभा दिवसभरासाठी तहकूब करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्षांनी घेतला. एक मार्चपासून पेट्रोलच्या किंमतीत १.४० पैशांची वाढ करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे राज्यसभेतही पेट्रोलच्या वाढलेल्या किंमती आणि हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणी विरोधकांनी गदारोळ घातल्याने अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी दोन वेळा १० मिनिटांसाठी राज्यसभा तहकूब केली. मात्र त्यानंतरही गोंधळ कायम राहिल्याने राज्यसभाही दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. मात्र त्यानंतरही गोंधळ गोंधळ कायम राहिल्याने राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.