संदेश पारकर यांनी बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सरचिटणीस संदेश पारकर यांनी बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
‘‘संदेश पारकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हयात आता काँग्रेसला विरोधकच उरला नाही,’’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली, तर नारायण राणे यांनी मोठ्या मनाने जवळ केल्याबद्दल पारकर यांनी राणे कुटुंबीयांचे आभार मानले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धडाडीचे कार्यकर्ते संदेश पारकर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज होते. अखेर त्यांनी नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पारकर यांचे काँग्रेसमध्ये स्वागत करताना राणे म्हणाले, ‘‘विधायक सामाजिक कार्य करायचे असेल, तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही, याची खात्री पारकर यांना पटली. म्हणून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. ते काँग्रेसमध्ये आल्यामुळे आता आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोधकच उरलेला नाही,’’ असे सांगून राणे यांनी पारकर यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
‘नारायण राणे यांच्या मनाचा मोठेपणा’
‘‘सिंधुदुर्ग जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यासाठी आपण खूप प्रयत्न केले. ते करत असताना काही वेळा काँग्रेसविरोधी भूमिका घ्यावी लागली. मात्र राष्ट्रवादीने मला वाऱ्यावर सोडल्यानंतर भूतकाळ विसरून नारायण राणे यांनी मला स्वीकारले, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे,’’ असे संदेश पारकर यांनी या वेळी सांगितले. माझ्या काँग्रेस प्रवेशाचा मार्ग ‘स्वाभिमान’चे संस्थापक-अध्यक्ष नितेश राणे यांनी अधिक सुकर केला.
राष्ट्रवादीचे काम करत असताना नितेश राणे यांच्याशी माझा संपर्क आला. त्यांचे व माझे विचार जुळले आणि मी काँग्रेसमध्ये आलो. या पक्षात मला चांगले काम करण्याची संधी मिळेल. आता मी राणे कुटुंबीयांचाच घटक झालो आहे, असे भावूक उद्गारही पारकर यांनी काढले.