येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त याचा सहभाग असलेला ‘महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन’ हा कार्यक्रम गुरुवारी अचानक रद्द करण्यात आला.
पुणे- येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त याचा सहभाग असलेला ‘महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन’ हा कार्यक्रम गुरुवारी अचानक रद्द करण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी सांगितले.
तुरुंग विभागाच्या कल्याणकारी योजनांना आíथक मदत मिळवून देण्याच्या उद्देशाने कारागृह प्रशासनाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गुरुवारी सायंकाळी ४ वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणा-या कार्यक्रमात संजय दत्त नाटिका आणि नृत्य सादर करणार होता. या कार्यक्रमाची सर्व तयारी झाली होती. ५० हून अधिक कैदी यात सहभाग घेणार होते. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून रंगीत तालीमही सुरू होती. मात्र, सुरक्षेचे कारण देत अचानक हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. या कार्यक्रमाच्या तिकिटांची यापूर्वीच विक्री झाली होती. मात्र, कार्यक्रम रद्द झाल्याने प्रेक्षकांना तिकीटाचे पैसे परत करण्यात आले.
दरम्यान, कार्यक्रमाला असलेल्या धोक्याबाबत गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. कार्यक्रम रद्द करावा लागल्याचे दु:ख आपल्यालाही आहे. लवकरच येरवडा कारागृहातच हा कार्यक्रम घेण्यात येईल, असेही बोरवणकर यांनी सांगतिले.