माजी लष्करप्रमुख आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के.सिंह ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा पोहोचल्याने त्यांना संघाने कार्यक्रमाला संबोधित करण्याची परवानगी नाकारली.
आग्रा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला माजी लष्करप्रमुख आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के.सिंह ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा पोहोचल्याने त्यांना संघाने कार्यक्रमाला संबोधित करण्याची परवानगी नाकारली.
उत्तरप्रदेशात आग्र्यामध्ये आरएसएसचे तीन दिवसीय युवा संकल्प शिबिर सुरु आहे. रविवारी या शिबिरातील सुरक्षा धोरणाच्या एका सत्राला व्ही.के.सिंह संबोधित करणार होते. तासाभरासाठी व्ही.के.सिंह मार्गदर्शन करणार होते.
सिंह यांचे सत्र अकरा वाजता सुरु होणार होते. मात्र सिंह प्रत्यक्षात दीडतास उशिराने साडेबारा वाजता पोहोचले. त्यामुळे आरएसएसने त्यांना संबोधित करण्याची परवानगी नाकारली तसेच या कार्यक्रमात त्यांना दुस-या रांगेत बसवण्यात आले. सरसंघचालक मोहन भागवतही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
आम्ही कुणाही व्यक्तीसाठी आमच्या सत्रांची वेळ बदलत नाही. व्ही.के.सिंह उशिरा आले त्यामुळे त्यांना संबोधित करु दिले नाही. दुस-यांना शिस्त शिकवण्यासाठी आधी आपण शिस्त पाळली पाहिजे. नियम हे सगळयांसाठी सारखे असतात असे आरएसएसचे प्रसारमाध्यम प्रमुख विरेंद्र वर्षानेया यांनी सांगितले.