भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नियोजित अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी आपले पद कायम राखण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नियोजित अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी आपले पद कायम राखण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचाच प्रत्यय रविवारी आला. श्रीनिवासन यांनी चेन्नईत बोलावलेल्या दक्षिणकडील क्रिकेट संघटनांच्या बैठकीला आंध्रप्रदेश क्रिकेट असोसिएशन तसेच गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) पदाधिकारी अनुपस्थितीत राहिल्याने वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत.
जीसीए पदाधिका-यांच्या अनुपस्थितीचे कारण समजू शकले नाही. मात्र बैठकीला निमंत्रण असल्याचे सांगितले. मात्र बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देण्यास नकार दिला. ‘‘बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी रविवारी चेन्नईत दक्षिणकडील क्रिकेट संघटनांची बैठक बोलावली होती. आम्हालाही निमंत्रण होते. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे आम्ही उपस्थित राहू शकलो नाही. बैठकीत काय घडले किंवा काय चर्चा झाली, हे मी सांगू शकत नाही. कारण ती अंतर्गत बैठक होती,’’असे जीसीएचे अध्यक्ष विनोद फडके यांनी दूरध्वनीवरून रविवारी ‘पीटीआय’ला सांगितले. श्रीनिवासन यांनी बोलावलेल्या बैठकीला तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन, हैदराबाद क्रिकेट असोसिएशन, केरळ क्रिकेट असोसिएशन, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते, असे समजते.
आयपीएलच्या सहाव्या मोसमात बेटिंग करण्यासह बुकीशी संपर्क केल्यावरून श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पनला अटक झाली होती. मय्यपनसह चेन्नई सुपर किंग्ज संघाची मालकी असलेल्या इंडिया सिमेंट्स कंपनीवरही आरोप झाले. त्यानंतर चौकशी समिती नेमताना बीसीसीआयने श्रीनिवासन यांना तात्पुरते बाजूला केले. श्रीनिवासन यांना अध्यक्षपदावरून दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा २९ सप्टेंबरला होईल.