अल्पावधीतच बहुचर्चित ठरलेल्या चिनी स्मार्टफोन उत्पादक श्योमीची फोन विक्री बंद करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत.
नवी दिल्ली- अल्पावधीतच बहुचर्चित ठरलेल्या चिनी स्मार्टफोन उत्पादक श्योमीची फोन विक्री बंद करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे ऑनलाइन विक्रेत्या फ्लिपकार्टच्या माध्यमातून होणारी ही फोन विक्री थांबवावी लागणार आहे. इरिक्सनकडे पेटंट असलेली मोबाइल फोन टेक्नॉलॉजी बेकायदा वापरली जात असल्याचा आक्षेप इरिक्सनने नोंदवला होता. बंदीमुळे देशात ‘एमआय ३’, ‘रेडमी १एस’ आणि ‘रेडमी नोट’ या हिट ठरलेल्या फोनची विक्री अडचणीत आली आहे.
श्योमी आणि तिचे विक्री भागीदार यांना जोडणी, आयात किंवा विक्री करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. इरिक्सनकडे पेटंट असलेल्या मोबाइल टेक्नॉलॉजीचा वापर करून श्योमीकडून पेटंट नियमावलीचे उल्लंघन होत असल्याचे प्रथमदर्शनी समोर येत असल्याचे न्या. जी.पी. मित्तल यांनी आदेशात म्हटले आहे. याचिकाकर्त्यांला यामुळे तोटा झाला असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याबरोबरच एएमआर, ईडीजीई आणि थ्री-जी तंत्रज्ञान असलेल्या फोनची भारतात आजतागायत झालेल्या विक्रीच्या आकडेवारीचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासंबंधी श्योमी आणि फ्लिपकार्टला नोटिस बजावण्यात आली आहे. यामध्ये विक्रीतून मिळवलेल्या महसुलाची माहितीही मागवली आहे. शिवाय न्यायालयाकडून तीन स्थानिक आयुक्तांची नेमणूक करण्यात आली असून श्योमी आणि फ्लिपकार्ट यांच्याकडून मोबाइल साठवणुकीच्या जागी ते छापे टाकतील. ज्यामध्ये या ठिकाणी उपलब्ध दस्तावेज आणि बेकायदा मोबाइल सील करण्याची कारवाई केली जाईल. या आयुक्तांची फी इरिक्सन देणार असून चार आठवडयांत ते आपला अहवाल देतील, असे न्यायालयानेस्पष्ट केले आहे.
इरिक्सनने केलेल्या याचिकेत श्योमीकडून एएमआर, ईडीजीई आणि थ्री-जी या तंत्रज्ञानासंबंधी आठ पेटंटचे उल्लंघन होत असल्याचे म्हटले आहे. हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी परवाना घेण्याची सूचनाही श्योमीला करण्यात आली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करत जुलै २०१४मध्ये आपले फोन सादर केल्याचे इरिक्सनने स्पष्ट केले आहे.