काळ्या रंगाची एक वेगळी दुनिया आहे.. काहींना काळा रंग म्हणजे गूढ असे काहीतरी वाटते.. काहींना हा रंग नकोसा वाटतो.. मात्र हाच काळा रंग प्रकाशाचे उगमस्थान आहे.
ठाणे- काळ्या रंगाची एक वेगळी दुनिया आहे.. काहींना काळा रंग म्हणजे गूढ असे काहीतरी वाटते.. काहींना हा रंग नकोसा वाटतो.. मात्र हाच काळा रंग प्रकाशाचे उगमस्थान आहे. काळ्या काळोखातूनच प्रकाशाचा उगम होत असतो. पुराणात, भारतीय दंतकथेतही काळ्या रंगाचा उल्लेख आढळतो. अध्यात्माचा पायादेखील काळ्या रंगावर वसला आहे. जेव्हा सगळीकडे अंधकार असतो तेव्हाच आशेची पहाट काळ्या रंगातून उमलत असते. त्यातूनच एक चित्रकार या नात्याने चंद्रकांत चन्ने यांनी विविध कलाकृती साकार केल्या. ठाण्यात त्यांच्या चित्रांचे ‘ब्लॅक मिरर’ हे प्रदर्शन भरले आहे.
माणसाला झालेला आनंद, दुख, त्याच्या इतिहास अशा अनेक गोष्टी चन्ने यांच्या कुंचल्यातून कागदावर साकारत गेल्या. पांढ-या कागदावर केवळ काळ्या रंगात काढलेल्या या अनोख्या चित्रांचे प्रदर्शन ठाणे येथील आर्ट प्रिव्हिलेजमध्ये भरले आहे. त्यांच्या चित्रातून बालपणीच्या आठवणींना देखील उजाळा देण्यात आला आहे. चन्ने हे मूळचे नागपूरचे. गडचिरोली जिल्ह्यातील चिमूर हे त्यांचे कलाशिक्षण शांतीवन कोलकात्ता तसेच बडोद्याच्या कला महाविद्यालयात झाले. मुलांचे भावविश्व या विषयावर त्यांनी पीएचडी मिळवली आहे. मुंबईतील जे जे कला महाविद्यालय, बडोदा, जोधपूर, त्रिवेंद्रम, मद्रास-चेन्नई अशा अनेक ठिकाणी त्यानी प्राध्यापक म्हणून काम केले आहे.
देशविदेशात त्यांची अनेक चित्रप्रदर्शन झाली आहेत. त्यांची सर्व चित्रे हे काळ्या रंगाशी निगडीत आहेत.काळ्या रंगाचे विविध पैलू त्यानी चित्रकलेतून मांडले आहेत. याआधी काला खट्टा, लिव्हींग विथ ब्लॅक, ब्लॅक बुल अशी विविध प्रदर्शन त्यांची झाली आहेत.
मातेच्या गर्भात बाळ नऊ महिने वाढत असते तेव्हा तेथील काळोख हाच त्याचा सोबती असतो. तो जेव्हा गभार्तून बाहेरच्या जगात येतो त्यावेळी प्रकाशाशी त्याचा संबंध येतो. काळ्यातूनच प्रकाशाची वाट दिसत जाते. शांतीनिकेतनध्ये राहत असताना तेथील काळ्या रंगाच्या वास्तु, तेथे असलेला काळ्या रंगाचा वापर याचा प्रभाव माझ्यावरदेखील झाला असावा, माझे गुरू पद्मभूषण के. जी. सुब्रमणीयम यांचे शांतीनिकेतनला असलेले घर देखील काळ्या रंगाचे आहे. माझे नागपूरचे घर देखील काळ्या रंगातच आहे, हा काळा रंग खूप काही सांगून जातो. त्यातील गूढता शोधण्याचा, माझे बालपण, माझा भूतकाळ हा काळ्या रंगातून कागदावर मांडण्याचा माझा प्रयत्न असतो’, असे चंद्रकांत चन्ने सांगतात.
ब्लॅक मिरर या चित्रप्रदर्शनातून चंद्रकांत चन्ने यांची १५ चित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. ही चित्रे मानवी स्वभावाच्या प्रतिबिंबित घटनांची नोंद आहे. प्रतिकूल भूतकाल आणि प्रसंगी त्यातून होत असलेल्या व जीवन कठीण करणारया प्रसंगातून गेल्यावरही त्या आठवणीतून आनंद घेणा-या अजब मानसिकतेची मांडणी प्रतिबिंबीत करणारी मालिका म्हणजे ब्लॅक मिरर. विशिष्ठ काळ्या रंगपोतातून व लेपनातून झालेली ही निर्मिती चित्रकाराचे कलाक्षेत्रातील अनुभव सिध्द करते. हे चित्र प्रदर्शन सोमवार वगळता इतर दिवशी १ मे पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले आहे.