शिवा थापाने (५६ किलो) सोमवारी जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
अल्माटी (कझाकस्तान)- शिवा थापाने (५६ किलो) सोमवारी जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. १९ वर्षीय आशिया स्पर्धेतील विजेता बॉक्सर शिवाने अर्जेटिनाच्या अल्बटरे मेलियनचा २-१ असा पराभव केला. शिवाची आता उपांत्यपूर्व फेरीत अझरबैजानच्या जेव्हिड चॅलॅबियेवशी गाठ पडणार आहे. जर त्यात तो विजयी ठरला तर त्याचे किमान कांस्यपदक निश्चित होईल.
‘‘ही लढत चुरशीची झाली. मलाही बरेच ठोसे सहन करावे लागले. मात्र तरीही बाजी मारू शकलो. पहिल्या फेरीत शांतपणे खेळत होतो. त्यामुळे ती फेरी गमवावी लागली. मात्र त्यातून वेळीच धडा घेत पुढच्या दोन्ही फेरीत आक्रमक खेळलो त्याचा फायदा झाला,’’ असे शिवाने म्हटले. भारताचे प्रशिक्षक गुरबक्ष सिंग संधू यांनीही शिवाचे कौतुक केले. ‘‘शिवाची बाउट चुरशीची झाली. दोघांचेही काउंटर-पंच आणि फुटवर्क चांगले होते,’’ असे गुरबक्ष यांनी सांगितले. अन्य लढतीत भारताच्या ननॉव ठोकचोमला (४९ किलो) उपउपांत्यपूर्व फेरीत प्युएटरे रिकोच्या अँथनी रिव्हेराकडून ०-३ असा पराभव स्वीकारावा लागला. या लढतीत ननॉव विशेष प्रतिकार करू शकला नाही.
मनोजही उपांत्यपूर्व फेरीत
मनोज कुमारनेही (६४ किलो) उपांत्यपूर्व फेरी गाठताना कॅनडाच्या युस उलिसला २-१ असे नमवले.
आजच्या लढती (उपउपांत्यपूर्व फेरी)
विकास मलिक (६० किलो) वि. मिक्लोस वर्गा (हंगेरी), सुमीत सांगवान (८१ किलो) वि. सिरही नोविकाउ (बल्गेरिया), सतीश कुमार (+९१किलो) वि. यान सुड्झिलोस्की (बल्गेरिया)