शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्याची बातमी क्षणार्धात सर्वत्र पसरल्यानंतर मुंबईची पावलं थांबू लागली. दुकाने,हॉटेल्स, शॉपिंग्स, मॉल्स धडाधड बंद झाल्यानंतर थांबलेली मुंबई रात्रभर जागली.
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्याची बातमी क्षणार्धात सर्वत्र पसरल्यानंतर मुंबईची पावलं थांबू लागली. दुकाने,हॉटेल्स, शॉपिंग्स, मॉल्स धडाधड बंद झाल्यानंतर थांबलेली मुंबई रात्रभर जागली. शिवाजीपार्क, दादर, माहीम, वांद्र्यासह संपूर्ण मुंबईतील ओसाड रस्त्यांवर शिवसैनिकांचे जथ्येच्या जथ्येचा जमा झाले होते. कुणी श्रद्धांजलीचे बॅनर लावत होत तर कुणी बोर्ड लावत होत. तर कुणी श्रद्धांजलीच्या कमानी उभारत होते तर कुणी पुष्पवृष्ठी करण्यासाठी तयारी करत होते.अवघ्या मुंबईत आपल्या लाडक्या नेत्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी रात्रीचा दिवस केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची महायात्रा सकाळी साडेसात वाजता सुरू होऊन शिवसेनाभवन मार्गे शिवतीर्थावर अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याने या परिसरात त्यांच्या श्रद्धांजलीचे फलक लावण्यासाठी शिवसैनिक तहानभूक,झोप विसरून कामाला लागला. शिवाजीपार्क परिसरात अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार असल्यामुळे शिवसेनानेते आणि पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली स्टेज बांधण्याचे काम सुरू होते. मैदानासह आसपासच्या रस्त्यांची साफसफाई सुरू होती. तसेच रात्री साडेअकराच्या सुमारास मैदान परिसरात किटकनाश धुम्रफवारणी करण्यात आल्यामुळे आकाशातील ढगही खाली उतरल्याचा भास होत होते. पोलिसांच्या विशेष कुमक मैदान परिसरात नियोजन करत असली तरी नेहमीच या कट्टयावर बसणारे नागरिक निवांत बसलेले होते. मात्र साहेबांच्या जाण्याची चिंता त्यांच्या चेह-यावर दिसत होते. प्रत्येक चौकाचौकात एकच विषय होता तो म्हणजे आपले साहेब गेलेत.
साहेबांच्या मृत्यूमुळे शिवसैनिक पोरके झाले असले तरी त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी वॉर्डावॉर्डामध्ये शाखेच्या फलकांवर श्रद्धांजली लिहून तसेच त्यांचे बॅनर लावून इतर लावण्यासाठी प्रत्येक शाखाशाखांमध्ये जय्यत तयारी सुरू होती. प्रत्येक शाखा या रात्रभर जागा होत्या. साहेबांना निरोप देण्यासाठी, घरी न राहता सकाळी त्वरीत निघता यावे,यासाठी अनेक शाखांमध्ये शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. तिथूनच साहेबांच्या अंत्यदर्शनासाठी निघायचे नियोजन शाखांशाखांमधून होत होते.
शिवसेनाभवनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शाखा क्रमांक १८३चे शाखाप्रमुख भुपेंद्र महाले आणि टोनी डिमेलो, किशोर पाटील,प्रकाश आयरे यांच्यासह त्यांचे शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांची महायात्रा येत असलेल्या रस्त्यांवर श्रद्धांजलीच्या फलकांसह पुष्पवृष्ठीची जय्यत तयारी करत होते. बाळासाहेबांच्या अनेक सभांपूर्वी भगवे झेंडे आणि फलक लावण्यासाठी जय्यत तयारी करत रात्र जागवणा-या शिवसैनिकांना शनिवारची रात्र ही काळी रात्र ठरली. यापुढे बाळासाहेबांच्या सभेची भविष्यात कधीही तयारी करण्याची वेळ येणार नाही, या दु:खद भावनेनेच शिवसैनिक आपल्या लाडक्या दैवताला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी मदतीचा हात पुढे करताना,अनेकांना अश्रु आवरता येत नव्हते.
मनसेच्याही बाळासाहेबांना श्रद्धांजली
बाळासाहेबांची महायात्रा येत असलेल्या लेडी जमशेटजी मार्गावर माहीम चर्च ते शिवसेनाभवन आणि शिवाजीपार्क परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने श्रद्धांजली वाहणारे फलक रस्तोरस्ती लावण्यात आले होते. तर केशरी टुर्सच्यावतीने बाळासाहेबांना इलेक्ट्रिक एलईडी स्क्रिनद्वारे श्रद्धांजली वाहण्यात येत होती. हा फलक सर्वाचेच लक्ष वेधून घेत होता.