बेलापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विजय नाहटा यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक निर्णय अधिका-यांकडे केली आहे.
नवी मुंबई- बेलापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विजय नाहटा यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक निर्णय अधिका-यांकडे केली आहे. राष्ट्रवादीचे निवडणूक प्रतिनिधी असलेल्या अशोक पोहेकर यांनी १५१ बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिका-यांकडे निवेदन दिले असून नाहटा यांनी आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.
१५१ बेलापूर विधानसभा मतदारसंघातील नेरूळ येथील से. ११मधील शिवकृपा अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनच्या शेजारील जागेमध्ये शिवसेनेने आपले निवडणूक कार्यालय थाटले आहे. शिवकृपा अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन जवळील जागा सिडकोच्या मालकीची आहे. सिडकोने अद्याप कोणत्याही संस्थेस अथवा व्यक्तीला ती हस्तांतरित केलेली नाही. असे असताना शिवसेनेचे उमेदवार विजय नाहटा यांनी या जागेमध्ये निवडणूक कार्यालय सुरू केले असून या कोर्यालयाच्या परवानगीसाठी त्यांनी शिवकृपा अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनचा नाहरकत दाखला जोडला आहे, असे समजते. वस्तुत: ती जागा सिडकोची असल्यामुळे शिवकृपा अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनचा असे पत्र देण्याचा अधिकोरच नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.
कोणत्याही राजकीय पक्षाला, उमेदवाराला सरकारी जागेमध्ये पोस्टर, बॅनर, कटआउट, झेंडे लावणे अथवा कार्यालयासाठी मनाई करण्यात आली आहे. याचे उल्लंघन करणा-यास ३ वष्रे ६ महिन्यांपर्यंत शिक्षा आणि दंड होऊ शकतो. तसेच हा निवडणुकांतील भ्रष्टाचार असून सदस्य पदासाठी अनर्हतता मानली जाईल, असा स्पष्ट उल्लेख भारत निवडणूक आयोग यांनी प्रकाशित केलेल्या उमेदवारांच्या निर्देश पुस्तिकेत (पृष्ठ क्र. ३५) केला आहे, पोहेकर यांनी असा दाखला देत कारवाईची मागणी केली आहे.
सरकारी जागेत राजकीय पक्षाचे निवडणूक कार्यालय स्थापन करणे, ते कार्यालय सुरू करण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करणे, खोटी कागदपत्रे देण्यासाठी सहकारी संस्थांवर दबाव आणणे इत्यादी गुन्ह्यांसाठी शिवसेना उमेदवार विजय नाहटा यांना जबाबदार धरून त्यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे तसेच खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी फौजदारी कायद्याअंतर्गत ४२० कलमान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाचे अशोक पोहेकर यांनी निवडणूक निर्णय अधिका-यांकडे केलेल्या निवेदनात केली आहे.
स्वत:ला आयएएस अधिकारी आणि वकील म्हणविणा-या उच्चशिक्षित माजी सनदी अधिका-याने अशा प्रकारचा गुन्हा क रणे ही अत्यंत गंभीर बाब असून शिवसेना उमेदवार विजय नाहटा यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची उमेदवारी रद्द करावी. – अशोक पोहेकर, निवडणूक प्रतिनिधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष