कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी निवडणुकीआधी व्हीप (पक्षादेश) काढणा-या शिवसेनेची चिंता आणखीनच वाढण्याची चिन्हे आहेत.
ठाणे – कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी निवडणुकीआधी व्हीप (पक्षादेश) काढणा-या शिवसेनेची चिंता आणखीनच वाढण्याची चिन्हे आहेत. मंगळवारी ठाणे महापालिका उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी लोकशाही आघाडीच्या पार पडलेल्या बैठकीत लोकशाहीचा उमेदवार उभा राहण्यावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, शिवसेनेचे नगरसेवक आघाडीच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आल्याने परिवहनच्या निवडणुकीत पराभव झोंबलेल्या शिवसेनच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
ठाणे परिवहन सभापती निवडणुकीत भाजपचे अजय जोशी यांनी लोकशाही आघाडीच्या शैलेंद्र भगत यांना मतदान केल्याने लोकशाही आघाडीचे भगत निवडून आले होते. गेली २२ वर्षे परिवहन सभापतीपद शिवसेनेकडे असल्याने त्यांना हा धक्का पचवणे कठिण झाले. त्यामुळे परिवहनच्या निवडणुकीत शिवसेनेने राडा घालत उपमहापौर मिलिंद पाटणकर यांना मारहाण केली.
तसेच उपमहापौरपदाच्या पुढील निवडणुकीत दगाफटका होऊ नये, यासाठी शिवसेनेचे गटनेते संतोष ओढवले यांनी एक व्हीप (पक्षादेश) जारी केला आहे. यात त्यांनी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांचा हवाला देत या निवडणुकीपर्यंत कोणत्याही शिवसेना नगरसेवकाने शहर सोडून जाऊ नये, असे नमूद केले आहे. ही निवडणूक लोकशाही आघाडीनेही प्रतिष्ठेची केली आहे. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र फाटक, हणमंत जगदाळे आदी नेतेमंडळी उपस्थित होती.