मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात महापौरांना देण्यात आलेल्या ५० कोटी रुपयांच्या विकास निधीतील तब्बल ८० टक्के विकास निधी सत्ताधारी शिवसेना-भाजपाने लांबवला आहे.
मुंबई – मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात महापौरांना देण्यात आलेल्या ५० कोटी रुपयांच्या विकास निधीतील तब्बल ८० टक्के विकास निधी सत्ताधारी शिवसेना-भाजपाने लांबवला आहे. युतीच्या नगरसेवकांनी तब्बल ४० कोटींचा विकास निधी स्वत:च्या झोळीत टाकून घेताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा आणि मनसेच्या नगरसेवकांना केवळ दहा कोटीत गुंडाळले.
मात्र हा ५० कोटींचा निधी भूसंपादनासाठी तसेच कर्मचा-यांच्या रजेच्या पैशांसाठी तरतूद केलेल्या निधीतून वळता करण्यात आला आहे. आपल्याला निधी मिळावा म्हणून चक्क महापौरांनी कर्मचा-यांच्या पैशावरच डल्ला मारला आहे.
मुंबई महापालिकेच्या २०१६-१७च्या अर्थसंकल्पातील खर्चाच्या बाबीला मंजुरी देण्यात आल्यानंतर मंगळवारी या अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी दिली जात आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात स्थायी समितीने ३०० कोटींची तरतूद केल्यानंतर महापौरांच्या पदरी काहीच पडणार नाही, असे बोलले जात होते. परंतु शिवसेना नेत्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून आयुक्तांनी, महापौरांसाठी ५० कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार महापौरांनी, आपल्याला मिळालेल्या विकास निधीचे वाटप नगरसेवकांच्या विकासकामांसाठी केले आहे. यामध्ये शिवसेनेला ३० कोटी, भाजपाला १० कोटी आणि इतर विरोधी पक्षाला सुमारे १० कोटी अशा प्रकारे वाटप करण्यात आले आहे. ५० कोटींचा हा निधी विकास नियोजन विभागातील भूसंपादनासाठी राखीव ठेवलेल्या २२.४३ कोटी रुपये आणि कर्मचा-यांच्या रजेच्या रोखीकरणासाठी राखीव ठेवलेल्या निधीतून २७.५६ कोटींचा खर्च वळता करण्यात आल्याचे लेखा विभागाचे म्हणणे आहे.
मनसेच्या गटनेत्याला गाफील ठेवत १३ नगरसेवकांना निधी वाटप
मागील वेळेस झालेल्या विकास निधीमध्ये मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी स्टिंग ऑपरेशन करत निधी वाटपातील गैरव्यवहार बाहेर काढला होता. त्यामुळे यंदा संदीप देशपांडे यांना विचारात न घेताच महापौरांनी मनसेच्या १३ नगरसेवकांना परस्पर विकास निधीचे वाटप केले. यामध्ये सुरेश आवळे यांना २५ लाख रुपये तर इतर नगरसेवकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात आल्याचे समजते.
उद्धव ठाकरेंचे निधी वाटपावर विशेष लक्ष
महापौर स्नेहल आंबेकर यांनी मागील वेळेस केलेल्या निधी वाटपावरून मोठे वादळ नव्हे तर पक्षाची इभ्रत गेल्यामुळे यंदा ५० कोटी रुपयांचा निधी देण्याचे आयुक्तांनी मान्य केल्यानंतर खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागील वेळेस कोणत्या नगरसेवकांना किती वाटप केले होते, त्यांनी किती खर्च केला आणि कशासाठी केला होता, याची माहिती जाणून घेतली होती. त्यानंतर यंदाच्या वाटपात उद्धव ठाकरेंच्या सूचनेनुसारच हे वाटप झाल्याची चर्चा आहे.
फणसे, प्रभूंना डावलले
शिवसेनेच्या नगरसेवकांना जास्तीत जास्त विकास निधीचे वाटप करण्यात आले. यामध्ये स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे आणि नगरसेवक आमदार सुनील प्रभू यांना एकही पैसा देण्यात आलेला नाही. तर दीड कोटी रुपये मिळवत दहिसरमधील नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी आघाडी घेतली. त्याखालोखाल पूजा महाडेश्वर, कोमल जामसंडेकर, किशोरी पेडणेकर आणि अश्विनी मते यांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मिळवला.