मुंब्रा-शिळफाटा इमारत दुर्घटनेतील १६ गंभीर जखमींना सरकारच्या वतीने ८ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
![cheque distribution to mumbra building collapsed injured](http://prahaar.in/wp-content/uploads/2013/04/cheque-distribution.jpg)
ठाणे- मुंब्रा-शिळफाटा इमारत दुर्घटनेतील १६ गंभीर जखमींना सरकारच्या वतीने ८ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सोमवारी उपजिल्हाधिकारी मनोज रानडे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींना मदतीचे धनादेश सुपूर्द केले.
या इमारत दुर्घटनेत ७४ जण ठार तर ३५ जण जखमी झाले आहेत. यातील १२ गंभीर जखमी कळवा रुग्णालयात आणि ४ जण ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत आहेत. गंभीर जखमींना सरकारने प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत केली असून हे धनादेश त्यांना सुपूर्द करण्यात आले आहेत. या इमारतीतील गंभीर जखमी सायन रुग्णालयात आणि जीटी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांनाही मदत करण्यात येणार असल्याची माहिती रानडे यांनी दिली.
मजुरांचे खाते जागेवरच उघडले
या दुर्घटनेत जखमी झालेल्या मजुरांचे खाते इथे नाही. त्यामुळे सोमवारी बँकेच्या अधिका-यांना बोलावून या जखमींचे खाते उघडून मदतीची रक्कम या खात्यात जमा करण्यात आली आहे. दरम्यान, या इमारत दुर्घटनेतील ६४ जणांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. यातील १० मृतदेह अनोळखी आहेत. त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात येत आहे.