दिल्लीतील जामा मशीदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांच्या मुलाची उत्तराधिकारी म्हणून निवड करण्यास कोणत्याही कायदेशीर आधाराची गरज नसल्याचे शुक्रवारी उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
नवी दिल्ली – दिल्लीतील जामा मशीदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांच्या मुलाची उत्तराधिकारी म्हणून निवड करण्यास कोणत्याही कायदेशीर आधाराची गरज नसल्याचे शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे बुखारी यांना दिलासा मिळाला आहे. तसेच उद्या होणा-या दस्तारबंदी कार्यक्रमावर रोख लावण्यासही न्यायालायने नकार दिला आहे.
मुख्य न्यायमूर्ती जी.रोहिणी आणि न्यायमूर्ती आर.एस.एंडलॉ यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. हा सोहळा काही कायदेशीर नाही त्यामुळे या सोहळ्याला रोखता येणार नाही,असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच खंडपीठाने यासंबंधी नोटीस जारी केली असून बुखारी यांच्या मुलाला उत्तराधिकारी बनवण्याच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या तीन याचिकांवर न्यायालयाने केंद्र, वाक्फ मंडळ आणि बुखारी यांच्याकडून उत्तर मागितले आहे.
जामा मशीद ही दिल्ली वाक्फ मंडळाची मालमत्ता आहे आणि बुखारी हे तेथील कर्मचारी आहेत. त्यामुळे बुखारी हे आपल्या मुलाची उत्तराधिकारी म्हणून निवड करु शकत नसल्याची याचिका सुहैल अहमद खान, अजय गौतम आणि वकील व्ही.के. आनंद यांनी न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली