मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने पालिकेच्या शाळा खासगी संस्थांना दत्तक देण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात गुरुवार, 23 ऑगस्ट रोजी विविध पक्षांनी संयुक्त मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई – मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने पालिकेच्या शाळा खासगी संस्थांना दत्तक देण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात गुरुवार, 23 ऑगस्ट रोजी विविध पक्षांनी संयुक्त मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या 24 प्रभाग कार्यालयांसमोर मोर्चे काढण्यात येणार असल्याची माहिती समान शिक्षण मूलभूत अधिकार समितीचे प्रमुख श्याम सोनार यांनी दिली.
भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर या संयुक्त मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. या मोर्चात जनता दल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भाकपा (माले-लिबरेशन), पीपल्स रिपब्लिकन पार्टी, भारतीय म्युनिसिपल कामगार संघ, म्युनिसिपल कर्मचारी युनियन, समान शिक्षण मूलभूत अधिकार समिती, मुंबई शिक्षक सभा, शिक्षक लोकशाही आघाडी, रिपब्लिकन पँथर, भारतीय बहुजन कामगार सेना, विद्यार्थी भारती, रिपब्लिकन टायगर सेना, ओबीसी परिषद आदी पक्ष, संघटनांचे असंख्य कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
महापालिकेतील सत्ताधारी युतीने शिक्षण, आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढले. त्यासाठीचा कोट्यवधींचा निधी उपलब्ध असतानाही त्यात सुधारणा करण्याऐवजी आहेत त्या शाळा आणि रुग्णालये बंद कसे पडतील याचीच खबरदारी घेतली. अनेक महत्त्वाच्या शाळांच्या इमारतींच्या जागा एनजीओ आणि खासगी संस्थांच्या ताब्यात दिल्या. यामुळे येथील शिक्षणाचा दर्जा ढासळला आहे, असा आरोप सोनार यांनी केला.
महापालिकेने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप धोरण रद्द करावे, महापालिकेच्या शाळांमधील गुणवत्ता आणि दर्जा सुधारण्यासाठी महापालिकेने स्वत:च प्रयत्न करावेत, यासाठी तज्ज्ञ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची कायमस्वरूपी पद्धतीने नियुक्ती करावी, किमान दहावीपर्यंतची मोफत आणि सक्तीच्या दर्जेदार शिक्षणाची जबाबदारी महापालिकेने पूर्ण करावी, त्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, महापालिकेच्या कोणत्याही शाळा, मैदाने, रुग्णालये त्यांच्यातील विभाग कॉर्पोरेट कंपन्या, खासगी संस्था, एनजीओ, परदेशी संस्था, उद्योग यांना चालवण्यास किंवा वापरण्यास देऊ नयेत, आदी मागण्या यावेळी करण्यात येणार आहेत, असे सोनार म्हणाले.