शारदा चिटफंड घोटाळ्यातील आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचे निलंबित खासदार कुणाल घोष यांनी तुरुंगात झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
कोलकाता – शारदा चिटफंड घोटाळ्यातील आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचे निलंबित खासदार कुणाल घोष यांनी गुरुवारी रात्री अलिपूर तुरुंगात झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
या प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गृहसुधार निरीक्षक, तुुरुंगातील डॉक्टर आणि या प्रकरणात हात असलेल्या तुरुंगातील कर्मचा-यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
कुणाल घोष यांनी आत्महत्या करण्यासाठी झोपेच्या गोळ्या घेतल्या. काही वेळाने त्यांनी हे डॉक्टरांना सांगितले. त्यानंतर त्यांना ताबडतोब एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पश्चिम बंगाल गृहसुधार मंत्री एच.के.स्वाफी यांनी सांगितले.
१० नोव्हेंबर रोजी घोष यांनी स्थानिक न्यायालयात हजर करण्यापूर्वी येत्या तीन दिवसांत जर सीबीआयने या घोटाळ्यात सहभागी असलेल्या अन्य आरोपींवर योग्य कारवाई केली नाही तर मी आत्महत्या करेन अशी धमकी दिली होती. या घोटाळ्यात सहभागी असलेले इतर आरोपी स्वतंत्रपणे फिरत आहे आणि मी मात्र येथे तुरुंगात आहे. मी तीन दिवसांची मुदत देतो, जर या तीन दिवसांत घोटाळ्यातील इतर सहभागी लोकांवर योग्य कारवाई झाली नाही तर मी आत्महत्या करेन असे घोष यांनी न्यायदंडाधिकारी अरविंद मिश्रा यांना सांगितले होते.
कुणाल घोष हे शारदा ग्रुपचे माजी सीईओ आहेत. कोट्यावधीच्या शारदा चिटफंड घोटाळ्यातील ते आरोपी आहेत. गेल्या एक वर्षांपासून ते तुरुंगात आहेत.