इजिप्तने दिलेली शस्त्रसंधीची योजना हमासने नाकारल्यास गाझापट्टीत लष्करी कारवाई अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा इस्रायलने दिला आहे.
तेलअविव- इजिप्तने दिलेली शस्त्रसंधीची योजना इस्रायलने स्वीकारली आहे. मात्र ही योजना हमासने नाकारल्यास गाझापट्टीत लष्करी कारवाई अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांनी मंगळवारी दिला.
तेलअविव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नेत्यनाहू म्हणाले की, हमासने शस्त्रसंधीचा प्रस्ताव नाकारल्यास गाझा पट्टीत लष्करी कारवाई मोठ्या प्रमाणावर सुरू करेल. तसेच इस्रायलवर रॉकेट हल्ले न थांबवल्यास त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. इस्रायली नागरिकांची सुरक्षा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
गाझा पट्टीतून लष्कर हटवावे अशी इस्रायलची इच्छा आहे. आम्ही शस्त्रसंधीच्या इजिप्तच्या प्रस्तावाला आम्ही पाठिंबा देत आहोत. क्षेपणास्त्र, रॉकेट आणि खंदक यातून गाझापट्टीची सुटका व्हावी अशी आमची इच्छा आहे, असे नेत्यनाहू म्हणाले.
दरम्यान, हमासने इजिप्तचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव नाकारला असून मंगळवारी सकाळी इस्त्रायलच्या अँशकेलॉन शहरावर तीन रॉकेट डागली. मात्र ती मोकळ्या भागात कोसळल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही.
शस्त्रसंधी स्वीकारण्याचे अमेरिका, जर्मनीचे आवाहन
जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही हमासला इजिप्तचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारण्याचा सल्ला दिला. गाझा पट्टीचा वापर हमासने कायम लढण्यासाठी केला आहे. यामुळे गाझापट्टीतील नागरिकांना वेठीस धरले जात आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनीही ‘हमास’ला इजिप्तचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती केली आहे. इस्रायलने शस्त्रसंधीचा प्रस्ताव मंजूर केल्याचे केरी यांनी अभिनंदन केले. इजिप्तचा प्रस्ताव स्वीकारल्यास या भागातील हिंसाचार थांबून शांतता प्रस्थापित होऊ शकेल, असे केरी यांनी पत्रकात म्हटले आहे.
हमासने शस्त्रसंधी फेटाळली
पॅलेस्टिनमधील शस्त्रसंधीचा प्रस्ताव हमासने फेटाळून लावला आहे. आम्ही इस्रायलच्या अशदोद शहरावर आठ रॉकेट डागल्याचा दावा हमासच्या लष्करी विभागाने केला.