भारताचा ग्रॅँडमास्टर कृष्णन शशीकिरणने बुधवारी बुद्धिबळ वर्ल्डकपच्या दुस-या फेरीतील पहिल्या लढतीत अव्वल प्रतिस्पर्धी रशियाच्या सर्जी कार्याकिनला बरोबरीत रोखले.
ट्रॉम्सो (नॉर्वे)- भारताचा ग्रॅँडमास्टर कृष्णन शशीकिरणने बुधवारी बुद्धिबळ वर्ल्डकपच्या दुस-या फेरीतील पहिल्या लढतीत अव्वल प्रतिस्पर्धी रशियाच्या सर्जी कार्याकिनला बरोबरीत रोखले. याउलट ग्रॅँडमास्टर बी. अधिबानने ब्राझीलच्या अलेक्झांडर फिएरविरुद्ध विजयाची संधी गमावली. त्यालाही बरोबरीत समाधान मानावे लागले.
माजी राष्ट्रीय विजेता शशीकिरणने पांढ-या मोहरीसह किंग्ज इंडियन अॅटॅक पद्धतीचा अवलंब करत कार्याकिनला आश्चर्यचकित केले. कार्याकिनने सुरुवातीच्या काही चाली खेळायला वेळ घेतला मात्र त्याची तयारी इतकी चांगली होती की मधल्या टप्प्यात काही उत्कृष्ट चाली खेळल्या. त्यातच त्याने वजिरालाही ब-यापैकी पुढे आणल्याने शशीकिरणला सावध राहावे लागले. मात्र शशीकिरणनेही तोडीसतोड खेळ केल्याने कार्याकिनने ४४व्या चालीला बरोबरीची विचारणा केली. ती शशीकिरणने मान्य केली.
अधिबानने पांढरी मोहरी घेऊन खेळताना मार्शल गॅम्बिटचा अवलंब केला. मात्र फिएरने नोटेबूम व्हेरिएशन वापरली. त्यातच फिएरने १४व्या चालीत हत्तीला जाणूनबुजून गमावले. मात्र त्याचे ते नियोजन साफ चुकले. कारण नंतर त्याच्यावर दडपण वाढत गेले. विजयाची संधी दिसू लागल्यावर अधिबानने चाली खेळायला बराच वेळ घेतला. मात्र वेळ संपायला लागल्याने अधिबानला नाइलाजाने बरोबरी स्वीकारावी लागली. जी. आकाश आणि परिमार्जन नेगीचे आव्हान पहिल्याच फेरीत संपल्याने आता अधिबान आणि शशीकिरणवर भारताच्या आशा आहेत.
अन्य मानांकितांसाठी बुधवारचा दिवस चांगला ठरला. अलेक्झांडर मोरोझेविच आणि अलेक्झांडर ग्रिशुक (दोघेही रशिया), गाटा कामस्की, हिकरू नाकामुरा (दोघेही अमेरिका), अनिश गिरी (हॉलंड) व्हॅसिली इवानचूक (युक्रेन) आणि फॅबियो कॅरुआनाने (इटली) त्यांच्यापेक्षा रॅँकिंगने कमी असणा-या प्रतिस्पध्र्यावर सहज विजय नोंदवले. मात्र धक्कादायक विजय पेरूच्या ज्युलियो ग्रॅँडा झ्युनिगाने हंगेरीच्या पीटर लेकोवर मिळवला. इस्रयलचा बोरिस गेलफॅँड, अझरबैजानचा तैमूर राद्याबॉव आणि रशियाचा पीटर स्विडलर यांना त्यांच्या प्रतिस्पध्र्याविरुद्ध बरोबरीत समाधान मानावे लागले. आर्मेनियाच्या लेवॉन अरोनियनलाही काळी मोहरी घेऊन खेळताना त्याची लढत बरोबरीत सोडवावी लागली.
महेश्वरीसह महिला रिले संघाची आज परीक्षा
थाळीफेकीसह धावणे प्रकारात निराशाजनक कामगिरी राहिल्यानंतर तिहेरी उडीत रंजिथ महेश्वरी अग्णि महिला रिले संघाकडून भारताला मोठय़ा अपेक्षा आहेत. महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले संघात एम. आर. पुवाम्मा, टिंटू लुका, अनू मॅरियाम जोस, अश्विनी अक्कुंजी, निर्मला आणि अनिल्डा थॉमसचा समावेश आहे.
पुरुष तिहेरी उडी (पात्रता फेरी)
पात्रता फेरीत पात्र ठरल्यास रंजिथला रविवारी (१८ ऑगस्ट) पदकासाठीच्या ‘रेस’मध्ये सहभागी होता येईल.
वेळ : स. ११:३० वा.
४ बाय ४०० मीटर रिले महिला (हिट्स)
एम. आर. पुवाम्मा, टिंटू लुका, अनू मॅरियाम जोस, अश्विनी अक्कुंजी, निर्मला आणि अनिल्डा थॉमस हा संघ हिट्समध्ये पात्र ठरला तर त्यांना शनिवारी (१७ ऑगस्ट) होणा-या ‘फायनल’मध्ये सहभाग घेता येईल.
वेळ : दु. १ वा.
थेट प्रक्षेपण : दु. १२ वाजल्यापासून टेन स्पोर्ट्सवर.
फराह दुसरे सुवर्ण जिंकेल?
मॉस्को- जागतिक अॅथ्लेटिक्स स्पर्धेच्या पहिल्या दिवशी १० हजार मीटर धावण्याच्या रेसमध्ये बाजी मारणारा ब्रिटनचा ऑलिंपिक विजेता मो फराह शुक्रवारी (१६ऑगस्ट) ५ हजार मीटर रेसमध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी उत्सुक आहे. अशी कामगिरी केल्यास जागतिक स्पर्धेत ‘सुवर्ण’ राखणारा तो ब्रिटनचा पहिला क्रीडापटू ठरेल.
वेळ : रा. १०:१५ वा.