शनी शिंगणापूर देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच एका महिलेची निवड करण्यात आली असून अनिता शेटे अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत.
अहमदनगर- शनिशिंगणापूर देवस्थानच्या इतिहासात क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे. शनी शिंगणापूर देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच एका महिलेची निवड करण्यात आली असून अनिता शेटे अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. तर नानासाहेब बानकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
शनिशिंगणापूरच्या चौथ-यावर एका महिलेने प्रवेश केला आणि त्याचे पडसाद देशभरात उमटले. त्यानंतर पवित्र्य भंग पावल्याचा दावा करून पुजा-यांनी शनीच्या शीळेवर अभिषेक केला होता. यानंतर ४ ते ५ महिलांनी विश्वस्तपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. अखेर देवस्थानच्या विश्वस्त मंडळात पहिल्यांदाच महिलांचा समावेश करण्यात आला आहे.
सहायक धर्मादाय आयुक्तांनी या विश्वस्त मंडळाची यादी जाहीर केली. शनिशिंगणापूर देवस्थानच्या अकरा सदस्यीय विश्वस्त मंडळात अनिता शेटे आणि शालिनी लांडे या दोन्ही महिलांना संधी मिळाली. निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर सोमवारी अध्यक्षपदावर अनिता शेटे यांची निवड झाली आहे.
आता नव्या महिला अध्यक्षा चौथा-यावर महिलांना प्रवेश देणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.