२९ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या नेरळ-माथेरान मिनी ट्रेनच्या अमनलॉज-माथेरान शटल सेवेने अल्पावधीतच प्रचंड वेग पकडला असला तरी या सेवेमुळे येथील अश्वपालांसोबतच हातरिक्षाचालक मात्र अडचणीत आले आहेत.
माथेरान – २९ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या नेरळ-माथेरान मिनी ट्रेनच्या अमनलॉज-माथेरान शटल सेवेने अल्पावधीतच प्रचंड वेग पकडला असला तरी या सेवेमुळे येथील अश्वपालांसोबतच हातरिक्षाचालक मात्र अडचणीत आले आहेत. पर्यटकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मध्य रेल्वेने स्वत:च्या वेळापत्रकालाच छेद देत या सेवेच्या दररोज १० ते १२ फे-या मारण्यास सुरुवात केल्याने इंदिरानगर येथील लॉजिंग व्यवसायावरही मंदीचे सावट आहे.
मिनी ट्रेनची शटल सेवा सुरू झाली, त्या वेळी मध्य रेल्वेने या सेवेसाठी माथेरानवरून ५ फेऱ्या आणि अमनलॉज येथून ५ फे-या मारणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र पहिल्याच दिवशी पर्यटकांनी या सेवेला प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळे पहिल्याच दिवशी मिनी ट्रेनच्या ७ फे-या झाल्या. त्यानंतर ३० सप्टेंबरपासून शटल सेवेच्या १० फे-या करण्यात आल्या.
सध्या या मार्गावर दररोज या शटल सेवेच्या १० ते १२ फेऱ्या होत आहेत. पर्यटकही या सेवेला प्रतिसाद देत असल्यामुळे येथील हातरिक्षाचालक, अश्वपाल यांचा व्यवसाय मात्र धोक्यात आला आहे. या सेवेमुळे पर्यटक थेट माथेरानमध्ये पोहोचत असल्याने इंदिरानगर भागातील लॉजिंग व्यावसायिकांनी सोबतच परिसरातील व्यापा-यांचा रोजगार संपुष्टात आला आहे.
मध्य रेल्वेचा वेळापत्रकाला छेद?
दस्तुरी नाका येथे येणा-या पर्यटकांचा प्रवास पूर्वी घोडय़ावरून तर महिला, वृद्ध हे हातरिक्षातून प्रवास करायचे. मात्र शटलसेवा सुरू झाल्यापासून या व्यावसायिकांचा काडीचाही व्यवसाय झालेला नाही. मध्य रेल्वेने ५ फे-यांचे वेळापत्रक जाहीर केलेले असताना १० फे-या मारण्याची गरज होती का? माथेरानला येणा-या प्रत्येक पर्यटकाने मिनी ट्रेनच्या शटलनेच प्रवास करावा, अशी रेल्वेची अपेक्षा आहे का, असा प्रश्न हातरिक्षाचालक विचारत आहेत.
[EPSB]
अमन लॉज-माथेरान शटलला मुहूर्त सापडेना
माथेरानकरांची मागणी लक्षात घेता मध्य रेल्वेने अमन लॉज-माथेरान शटल सेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दिला होता.
[/EPSB]