कोकणात जाणा-या गणेशभक्तांकडून रेल्वे आणि खासगी वाहतुकदार हजारो रुपये घेत असताना अवघ्या शंभर रुपयांत कोकणात जाण्याचे खासगी बसचे तिकीट ‘स्वाभिमान’ संघटनेने उपलब्ध करून दिले आहे.
मुंबई – कोकणात जाणा-या गणेशभक्तांकडून रेल्वे आणि खासगी वाहतुकदार हजारो रुपये घेत असताना अवघ्या शंभर रुपयांत कोकणात जाण्याचे खासगी बसचे तिकीट ‘स्वाभिमान’ संघटनेने उपलब्ध करून दिले आहे. या अभिनव योजनेतील पहिल्या सहा बस रविवारी शेकडो कोकणवासीयांना घेऊन कोकणात जाणार आहेत. दादर येथे ‘स्वाभिमान’ संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष नितेश राणे हे झेंडा दाखवून गणपतीला गावी निघालेल्या कोकणी जनतेला शुभेच्छा देणार आहेत. बोरिवली, दादर, नालासोपारा, ठाणे आणि डोंबिवली येथून रविवारी दुपारी चार वाजता एकाचवेळी या बस सुटणार आहेत.
‘स्वाभिमान’चे संस्थापक-अध्यक्ष नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेसाठी खासगी बसची व्यवस्था केली. अवघ्या शंभर रुपयांमध्ये या बससेवेच्या तिकीट नोंदणी आणि विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. अवघ्या तीनच दिवसांत सर्व बस हाऊसफुल्ल झाल्या. २४ ऑगस्ट रोजी ७ बस, २५ आणि २६ ऑगस्ट रोजी प्रत्येकी ८ तर २७ व २८ ऑगस्ट रोजी प्रत्येकी २४ बस सोडण्यात येणार आहेत.
या सर्व बसचे तिकीट मिळवण्यासाठी तीन दिवस वांद्रे येथील स्वाभिमानच्या कार्यालयावर नागरिकांनी पहाटेपासून गर्दी केली होती. तब्बल साडेतीन हजार तिकीटांची विक्री व नोंदणी करण्यात आली. मात्र नागरिकांच्या मागणीखातर आणखी काही बस वाढवून तब्बल ७६ बस सोडण्यात येणार आहेत. कोकणातील जनता गणपतीसाठी आवर्जून गावाला जाते. परंतु खासगी बसवाल्यांकडून कोकणातील जनतेची होणारी लूटमार लक्षात घेता ‘स्वाभिमान’चे अध्यक्ष नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेसाठी १०० रुपयांत तिकीट दर आकारून मोठा दिलासा दिला.
या तिकिटांसाठी नोंदणी केलेल्या प्रवाशांना ‘स्वाभिमान’च्या कार्यालयातून दूरध्वनीवरून वैयक्तिक संपर्क साधून तिकीट क्रमांक, बस क्रमांक, बस सुटण्याचे ठिकाण व वेळ आदींची माहिती दिली आहे. दादरमधून सुटणा-या दोन बसना नितेश राणे हे झेंडा दाखवून प्रवाशांना शुभेच्छा देणार आहेत. या बसमधील प्रवाशांची गैरसोय होऊ नये याची विशेष काळजी ‘स्वाभिमान’च्या कार्यकर्त्यांकडून घेतली जाणार आहे.
दादर पश्चिम : २ बस
दादर पश्चिम सेनापती बापट मार्ग.
बोरिवली पूर्व : २ बस
बोरिवली पूर्व येथील नॅशनल पार्कजवळ
नालासोपारा पूर्व : १ बस
आचोळे रोड, स्वाभिमान कार्यालय.
ठाणे : १ बस
ठाण्यातील तीन हात नाका
डोंबिवली पश्चिम : १ बस
डोंबिवली पश्चिम येथील द्वारका हॉटेलजवळ