फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या मैत्रिणीबरोबर ‘व्हॅलेंटाइन डे‘ साजरा करण्यासाठी आलेल्या तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरगाव येथे घडली.
गुरगाव- फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या मैत्रिणीबरोबर ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यासाठी आलेल्या तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरगाव येथे घडली. रविवारी उशिरा रात्री हा प्रकारसमोर आला.
ईश्वर (२७) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो दिल्लीचा रहिवासी होता. रमेश (३०) आणि अनिल कुमार (२५) यांनी ईश्वरचा खून केला. रमेश हा त्या तरुणीचा भाऊ आहे.
मागील सात महिन्यांपासून फेसबुकवर ईश्वरची एका तरुणीबरोबर मैत्री झाली. त्या दोघांनी गुरगावमध्ये एकत्र व्हॅलेंटाईन्स डे साजरा करायचे ठरविले होते. त्यानुसार तरुणीला तो हुडा सिटी सेंटर येथील सुशांत लोक परिसरात भेटला. ईश्वर आणि तरुणी तिच्या फ्लॅटवर जाऊन बसले होते.
त्यावेळी तरुणीचा भाऊ रमेश आणि ड्रायव्हर अनिल कुमार हे त्या फ्लॅटवर पोहोचले. ईश्वर आणि तरुणीला एकत्र पाहून तरुणीचा भाऊ रमेश संतापला. रमेश आणि अनिलने मिळून ईश्वरला जबर मारहान केली. त्यानंतर ईश्वरला खाली फेकून दिले.
ईश्वरला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दोघांच्या विरोधात सुशांत लोक पोलीस स्थानकात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.