तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या वापरावर सरकारचे कडक निर्बंध असले तरी ते धाब्यावर बसवून या पदार्थाचे मुंबईत अनेक ठिकाणी सर्रास सेवन केले जाते. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री १८ वर्षाखालील मुलांना करण्यास कायद्याने बंदी आहे.
चांगल्या गोष्टी माणूस चटकन स्वीकारत नाही; पण, वाईट गोष्टी तो पटकन स्वीकारतो, हा त्याचा स्वभावधर्म म्हणावा लागेल. वाईट सवयी, नको असलेले नाद, वाईट संगत, तंबाखू, दारू, चरस यासारख्या मादक आणि मारक पदार्थाचे सेवन, जुगार, रेस यासारख्या मनुष्याला अधोगतीला नेणा-या गोष्टी माणूस, विशेषत: तरुण पटकन शिकतात व त्यात वाहवत जातात. तंबाखू व सिगारेट सेवन यावर जरी निर्बंध असले तरी ते झुगारून ही व्यसनाधीन मंडळी आपली तलफ भागवून घेत असतात. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या वापरावर सरकारचे कडक निर्बंध असले तरी ते धाब्यावर बसवून या पदार्थाचे मुंबईत अनेक ठिकाणी सर्रास सेवन केले जाते. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री १८ वर्षाखालील मुलांना करण्यास कायद्याने बंदी आहे. तसे फलक, स्टिकर्सही हे पदार्थ विकल्या जाणा-या दुकानांवर व टप-यांवर लावले जातात. पण या पदार्थाची विक्री अनेक ठिकाणी १८ वर्षाखालील मुलांना केली जाते, असे आढळून आले आहे तसेच शाळा व महाविद्यालयांपासून १०० किलोमीटपर्यंतच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणारी दुकाने असू नयेत, असा नियम आहे. पण, हा नियमही बाजूला ठेवून शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात ही दुकाने राजरोसपणे सुरू असतात. सरकारने याबाबत जे नियम केले आहेत ते मोडण्यासाठीच आहेत, असा या मंडळींचा समज झालेला दिसतो. विशेषत: दादर, लालबाग-परळ परिसरात खूप शाळा व महाविद्यालये आहेत. या भागात या शिक्षण संस्थांच्या नजीकच ही दुकाने आहेत व त्याकडे ना पोलिसाचे लक्ष, ना शाळा चालकांचे लक्ष, ना सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्ष. परिणामी शाळा-महाविद्यालयांचा परिसर म्हणजे सिगारेट शौकिन तरुण आणि शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी सोडलेल्या धूम्र वलयांनी वेढलेला परिसर झाला आहे. १८ वर्षाखालील तरुणांना सिगारेट व तत्सम पदार्थाची विक्री केली जाणार नाही, अशी जरी पाटी लावण्यात आली असली तरी विक्रेता आणि १८ वर्षाखालील ग्राहक यांच्या दृष्टीने ही पाटी कोरीच असते. काही ठिकाणी तर सिगारेट वा अन्य पदार्थ विकत घेण्यासाठी १८ वर्षाखालील तरुण साधी शक्कल लढवतात. ते १८ वर्षावरील तरुणांना किंवा अन्य वयस्कर माणसाला सिगारेट वा सिगारेटचे पाकीट विकत घ्यायला सांगतात व मग ते दिवसभर सिगारेटचे झुरके मारायला व धूर सोडायला मोकळे. गुटख्यावर बंदी असतानाही त्याची बेकायदा विक्री होत असते. तंबाखू व गुटखा पाकिटे प्लॅस्टिकच्या पिशवीतून विकली जातात. महाराष्ट्र सरकारने राज्यात गुटखाबंदी केली तरी ही बंदी उठवण्यासाठी गुटखा उत्पादकांनी न्यायालयीन लढाई दिली. त्यात प्रथम उत्पादकांचा विजय झाला तरी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने ही गुटखा बंदी पुन्हा लागू केली. आज राज्यात गुटखा बंदी असली तरी गुटखा उत्पादकांनी नाना उपाय योजून पळवाटा शोधून काढल्या आहेत. गुटख्याची पाकिटे व नावे बदलण्याची क्लुप्ती त्यांनी शोधली आहे. पोलिस व अन्य संस्थाही यात फार लक्ष घालत नसल्यानेही गुटखा उत्पादकांचे फावले आहे. शिक्षण संस्थांच्या परिसरात सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थाचीच विक्री होते असे नव्हे तर या संस्थांच्या परिसरात दारूचे गुत्ते व बीअर बारही आहेत. विशेष म्हणजे अलीकडील काळात पानतंबाखूच्या टप-या शाळा व महाविद्यालयांचा परिसर हेरूनच सुरू केल्या जात आहेत. याबाबतच्या कायद्याची हे टपरीवाले फारशी फिकीर करत नाहीत. पोलिस किंवा अन्य संबंधित संस्थाही या प्रकाराची दखल घेत नाहीत. त्यामुळे या टप-या सर्वत्र फोफावल्या आहेत. त्यामुळे अगदी अल्पवयातच तरुणांना दारूचे वा बीअरचे व्यसन लागू शकते. ही व्यसनाधीन तरुण मंडळी लवकर घरी जात नाहीत. आपल्या पालकांपासून आपली व्यसने व छंद लपवण्यासाठी ही तरुण मंडळी रोज उशिरा घरी जातात. बारमध्ये यथेच्छ मद्यपान करणे, सिगारेट ओढणे हे त्यांचे उद्योग उशिरापर्यंत सुरू राहतात. काही तरुण मंडळी तर आपल्या परिसरातील इमारतीच्या पायरीवर ठाण मांडून बसतात आणि तेथेच ते मद्यपान करतात. तिथेच गाडीवर किंवा स्टॉलवर घेतलेल्या जेवणाचा आस्वाद घेतात. याही पलीकडे जाऊन अनेक तरुण चरस किंवा तत्सम मादक पदार्थाच्या आहारी गेलेले असतात. तंबाखू, सिगारेट व अन्य घातक उत्पादनांच्या वापराबाबत इशारे देणा-या जाहिराती वृत्तपत्रे, आकाशवाणी, वाहिन्या, भित्तीपत्रे याद्वारे प्रसिद्ध केल्या जातात तसेच सिगारेट, मादक पदार्थ व दारूचे व्यसन यापासून मुक्ती देणा-या संस्थांच्या जाहिराती व माहितीही प्रसिद्ध होत असते. पण, व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्ती त्याकडे लक्ष देत नाहीत. ही व्यसने किती घातक आहेत, याची त्यांना कल्पना नसते व कल्पना असली तरी त्यातून सुटण्याची त्यांची मानसिकता नसते. काही लोकांना आपण या व्यसनातून सुटावे, असे वाटले तरी त्यासाठी उपचार घेण्याची त्यांची मानसिकता बनत नाही. व्यसनामुळे आलेले मानसिक दौर्बल्य त्यांना उपचार घेऊ देत नाही. व्यसनाधीन व्यक्तींना सिगारेट व तंबाखूच्या वापराने कर्करोग होतो. दमा, छातीचे व श्वसनाचे विकार होतात, अशा जाहिराती व माहिती दिली जाऊनही तरुण वर्ग त्याकडे दुर्लक्ष करतो व संकट ओढवून घेतो. हे विकार जेव्हा लक्षात येतात तेव्हा उपचारासाठी फार उशीर झालेला असतो. कर्करोगासारख्या रोगावरील उपचारांचा खर्चही फार असतो तसेच अनेकदा लाखो रुपये खर्च करूनही त्याचा उपयोग होत नाही. अखेर या व्यसनाधीन तरुण व्यक्ती तंबाखूपासून झालेल्या व्याधींना बळी पडतात. यामुळे अशा घातक व्यसनांपासून दूरच राहणे श्रेयस्कर असते. सिगारेटचा आणखी एक दुष्परिणाम तो केवळ सिगारेट ओढणा-यावरच होतो असे नव्हे, तर त्या सिगारेटच्या धुराच्या संपर्कात येणा-या सर्वच माणसांवरही होतो. सिगारेट ओढणा-या माणसापेक्षा आजूबाजूच्या माणसांवर होणारा हा परिणाम अधिकच घातक असण्याची शक्यता असते. सिगारेट ओढणा-या माणसाला त्याची सिगारेट फिल्टर्ड असल्याने त्याला त्या सिगारेटपासून कमी त्रास पण त्याने सोडलेल्या धुराच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींवर त्याचा सहापट परिणाम होतो. घरात आईवडिलांनी लहानपणापासूनच जर मुलांना व्यसनांच्या घातक परिणामांची कल्पना दिली. त्यातील धोके ओळखून त्यापासून दूर राहण्याचा इशारा दिला तर त्याचा खूप चांगला परिणाम मुलांवर होतो आणि तो पुढील आयुष्यातही टिकून राहतो. हे काम शाळाही करू शकतात. पालक व शिक्षक यांनी हे काम केले तर त्याचा मोठा परिणाम समाजावर होऊ शकेल. पण हे काम जाणीवपूर्वक आणि पद्धतशीरपणे फारसे होत नाही. त्याचप्रमाणे सरकारनेही सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थाच्या उत्पादनापासून मिळणा-या उत्पन्नाकडे लक्ष न देता उत्पादकांना विशिष्ट कालावधीत ही उत्पादने बंद करायला लावण्याची योजना स्वीकारायला लावली पाहिजे. समाज, शिक्षक, विचारवंत आणि सरकार यांच्या सहकार्यानेच व्यसनमुक्तीचे स्वप्न साकार होऊ शकेल.
[EPSB]
ठकसेनांपासून सावध राहा
जगात फसवण्याचे अनेक प्रकार आहेत. फसवणारे ठक आणि महाठक आपल्या ‘बौद्धिक’ किंवा फसवण्याच्या कुवतीप्रमाणे लोकांना फसवण्याच्या व त्यांना हजारो रुपयांपासून तो लाखो रुपयांपर्यंतचा गंडा घालण्याच्या युक्त्याप्रयुक्त्या योजत असतात. फारसा विचार न करणारे व आमिषाला सहज बळी पडणारेच नव्हेत तर चांगली शिकली-सवरलेली मंडळीही या फसवणुकीला बळी पडतात.
[/EPSB]