मंडणगड राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या पदाधिका-यांनी वेसवी शिपोळे बंदरावर धडक भेट देऊन राजरोसपणे सुरू असलेल्या वाळू उपशाचा पर्दाफाश केला़
मंडणगड – मंडणगड राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या पदाधिका-यांनी वेसवी शिपोळे बंदरावर धडक भेट देऊन राजरोसपणे सुरू असलेल्या वाळू उपशाचा पर्दाफाश केला़ यावेळी घटनास्थळावरून वेसवी गावचे तलाठी सयद यांना दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी तो घेणे टाळल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांकडून करण्यात आला आहे.
यावेळी युवक राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिका-यांनी शिपोळे येथून एका खासगी बोटीने सागरी मार्गाने खाडीत जाऊन वेसवी शिपोळे बंदरामध्ये फेरी मारली. त्यावेळी वेसवी शिपोळे बंदर येथे पाच ते सहा डंपर उभे असल्याचे आढळल्याचे हसरत खोपटकर यांनी सांगितले.
घटनास्थळी उत्खनन केलेली वाळू पाच नौकांमधून डंपरमध्ये भरली जात असताना पकडली. यावेळी तलाठी श्री. सयद यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी २० कॉलपैकी एकदाही फोन उचलला नाही़ यानंतर मंडल अधिकारी श्री. गावडे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनीदेखील दूरध्वनी उचलणे टाळल़े यावर तालुकाध्यक्ष भाई मालगुंडकर यांनी थेट जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. भोगे यांना दूरध्वनीवरून या प्रकारची माहिती दिली़
त्यानंतर मात्र संबंधित यंत्रणेमध्ये हालचाल झाली आणि अखेर श्री. सयद यांना दूरध्वनी लावताच त्यांनी तो ‘रिसिव्ह’ केला. मात्र घटनास्थळी एकटे जाऊ शकत नसल्याने पोलिस ठाण्यातील कर्मचारी सोबत घेऊन जात सांगितले. याचदरम्यान बेकायदेशीररीत्या भरलेल्या वाळूच्या नौका सैरभैर पळवण्यात आल्या.
यावेळी तसेच भरलेले डंपर व रिकामे डंपर घटनास्थळावरून तत्काळ हलवण्याची कारवाई मात्र लगेचच सुरू झाली़ या सर्व प्रकारारवरून श्री. सयद यांनी शासकीय कर्तव्य बजावले नसले तरी वाळू व्यावसायिकांना वाचवण्याचे काम उत्तमरीत्या बजावल्याची चर्चा सुरू आह़े मात्र, या तलाठय़ासह मंडल अधिका-यासह इतर अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस युवक संघटनेच्या माध्यमातून पालकमंत्री व इतर शासनस्तरावर करण्यात येणार असल्याची माहिती युवक अध्यक्ष भाई मालगुंडकर यांनी दिली आह़े तसेच यापुढे या पंचक्रोशीत खाडीमध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून गस्त घालून या बेकायदेशीरपणे चालू असलेल्या उत्खननावर आळा घालण्याचे काम करणार असून शासनाच्या निकषांना डावलून काम करणाऱ्या सर्व दृष्ट प्रवृत्तींना वेळीच रोखण्याचे ठरविले असल्याची माहिती दिली आह़े