इमारती, चाळी किंवा नाक्यांवर वृत्तपत्र विक्री करणा-या पेपर विक्रेत्यांबाबत विचार सुरू आहे. त्यांचे एक विक्रेता मंडळ स्थापन करण्यात येणार आहे.
मुंबई- इमारती, चाळी किंवा नाक्यांवर वृत्तपत्र विक्री करणा-या पेपर विक्रेत्यांबाबत विचार सुरू आहे. त्यांचे एक विक्रेता मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. तसेच त्यांना दिलेले पेपरस्टॉल्स कायमस्वरूपी करण्यास सरकार सकारात्मक असल्याचे कामगारमंत्री प्रकाश मेहता यांनी सांगितले. काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी विचारलेल्या प्रश्नावर विधानसभेत कामगारमंत्र्यांनी हे मत व्यक्त केले.
बुधवारी विधानसभेत पत्रकारांच्या वेतनवाढीसाठी नेमलेल्या सातव्या न्या. मजिठिया वेतन आयोगाच्या शिफारशींची काटेकोर अंमलबजावणी होताना मालकांकडून टाळाटाळ होत असल्याबाबत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लक्षवेधी सूचना दिल्या होत्या. त्यावर कामगारमंत्री प्रकाश मेहता यांनी उत्तर दिले.
यावेळी चर्चा करताना काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांबरोबरच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नाला हात घातला. अनेक वृत्तपत्र विक्रेत्यांना पेपर विक्रीसाठी स्टॉल्स देण्यात आले आहेत. हे स्टॉल सरकार कायमस्वरूपी करणार का, असा प्रश्न राणे यांनी विचारला होता. त्यावर कामगारमंत्री प्रकाश मेहता यांनी राणे यांच्या प्रश्नाचे स्वागत करत वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉल्स कायमस्वरूपी करण्यास सरकार सकारात्मक असल्याचे सभागृहात सांगितले.
तसेच न्या. मजिठिया वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी वृत्तपत्राचे मालक व सरकारची आठ दिवसांच्या आत एकत्र बैठक घेण्यात येईल, असे आश्वासनही मेहता यांनी सभागृहाला दिले.