वेलिंगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च या व्यवस्थापन शिक्षणक्षेत्रातल्या अग्रणी संस्थेला स्वायत्ता देण्याच्या प्रस्तावाला मुंबई विद्यापीठाने अलीकडेच मंजुरी दिल्यामुळे संस्थेमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. अनेक मापदंडांवर पारखून मगच संस्थेच्या स्वायत्ततेला मंजुरी देण्यात आली आहे.
स्वायत्ता मिळवण्यासंबंधी वी-स्कूलचा प्रस्ताव मुंबई विद्यापीठाद्वारा राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाला पाठवण्यात आला होता. त्यांची मान्यता मिळाल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
या प्रस्तावावर मुंबई विद्यापीठाने मंजुरी दिली आहे. ही मान्यता सध्या पाच वर्षाच्या कालावधीसाठी देण्यात आली असून ती वी-स्कूलमधल्या मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापनविषयक पदवी अभ्यासक्रमांना लागू होईल.
पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळी या नामवंत शैक्षणिक प्रतिष्ठानची प्रि. एल. एन. वेिलगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट अँड रिसर्च (वी-स्कूल) ही मुंबई विद्यापीठाशी संलग्न संस्था असून इथे व्यवस्थापनविषयक मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (पूर्णवेळ) आणि मास्टर ऑफ मार्केटिंग मॅनेजमेंट, मास्टर ऑफ फायनान्स मॅनेजमेंट, मास्टर ऑफ इन्फॉम्रेशन मॅनेजमेंट आणि मास्टर ऑफ हय़ूमन रिसोर्स मॅनेजमेंट (अर्धवेळ) हे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातात.
वी-स्कूलमध्ये चालवले जाणारे हे अभ्यासक्रम अध्यापन पद्धतीत नियमांच्या चौकटीत राहूनही दर्शवलेली प्रयोगशील सर्जनशीलता, शिक्षकांची गुणवत्ता, शिक्षणाचा दर्जा, आधुनिक पायाभूत सुविधांची पूर्ती अशा अनेक मापदंडाच्या कसोटीवर पारखण्यात आले.
त्यानंतरच मुंबई विद्यापीठ, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने संस्थेला स्वायत्ता बहाल करण्याच्या प्रक्रियेला गती दिली आणि वी-स्कूलच्या शैक्षणिक उत्कृष्टतेवर स्वायत्ततेची मोहोर उमटवली. मुंबईतल्या विनाअनुदानित (बिगर अल्पसंख्याक) व्यवस्थापनविषयक शिक्षण संस्थांमध्ये स्वायत्ततेचा मान मिळवणारी वी-स्कूल ही पहिली संस्था आहे हे विशेष.
काळाची पावले ओळखून सतत बदलणा-या आíथक, राजकीय, सामाजिक बदलांशी सुसंगत असे शिक्षण देणे हा व्यवस्थापन शिक्षणप्रणालीचा गाभा आहे. आधुनिक अभ्यासक्रम तसेच अध्यापन पद्धती, विषयांच्या गरजेनुसार उपयोजनांसाठी वैविध्यपूर्ण उपक्रम राबवत मूल्याधिष्ठित शिक्षण देऊन उद्योग-व्यवसायांमध्ये सक्षमपणे कार्यरत होऊ शकणा-या सुशिक्षित, सुसंस्कारित विद्यार्थ्यांची पिढी घडवणे हे शिक्षण क्षेत्रासमोरचे एक मोठे आव्हान आहे.
वेलिंगकर इन्स्टिटय़ूटने ‘डिझाईन थिकिंग’ व ‘इनोव्हेशन’ या तत्त्वप्रणालीवर भर देणारे, भारतीय तंत्रशिक्षण मंडळाची मान्यता असणारे व्यवस्थापनविषयक पदविका अभ्यासक्रम सर्वात प्रथम सुरू केले. सर्जनशीलता व उपक्रमशीलतेला चालना देणा-या आपल्या अभिनव शिक्षण पद्धतीद्वारा जागतिक नागरिक-नेते घडवण्याची मोहीम यशस्वी करून दाखवत देशातल्या दहा प्रमुख बिझनेस स्कूलमध्ये आपले स्थान पक्के केले. तीच अभिनव शैक्षणिक तत्त्वप्रणाली व परंपरा आता विद्यापीठ पुरस्कृत पदवी अभ्यासक्रमांमध्ये रूजवून त्यांचा दर्जा व गुणवत्तेत सतत वृद्धी करण्याची एक उत्तम संधी स्वायत्ता मिळाल्याने वी-स्कूलला प्राप्त झाली आहे.
स्वायत्ता मिळालेल्या संस्थेला अभ्यासक्रमाची आखणी, विविध अध्यापन पद्धतीचा अवलंब, परीक्षा पद्धतीचे नियोजन तसेच मूल्यमापनाचे निकष ठरवण्याचे स्वातंत्र्य असते. तसेच शासन नियमांच्या आधीन राहून प्रवेशप्रक्रियेसंबंधी नियमन करण्याचे स्वातंत्र्य असते. या सगळ्यामुळे वी-स्कूलला आपल्या उद्योग-व्यवसायांसाठी कार्यक्षम व्यवस्थापक व उद्योजक प्रशिक्षित करण्याच्या ध्येयप्राप्तीत बहुमोल मदत होईल.
याचबरोबर इतर शैक्षणिक संस्था, व्यावसायिक संघटना, तसेच उद्योग व्यवसायांबरोबर हातमिळवणी करून संशोधन, परिषदा-चर्चासत्रे-कार्यशाळा, एक्सटेंशन प्रोग्रम्स, इंटर्नशिप्स अशा विविध माध्यमातून पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विकासाची अनेक दालने खुली करून देता येतील आणि त्यांना ख-या अर्थी जागतिक स्तरावरील नागरिक-नेते म्हणून घडवण्याच्या प्रक्रियेला गतिमान करता येईल.
वेलिंगकर इन्स्टिटय़ूटला स्वायत्ता मिळणे हे आमच्या भविष्यकालीन विकासाच्या योजनेनुसार खासगी विद्यापीठ म्हणून मान्यता मिळवण्याच्या मार्गावरचे महत्त्वाचे पाऊल असल्याचं शिक्षण प्रसारक मंडळी आणि वी-स्कूलच्या स्थानिक कार्यकारी समितीचे अध्यक्ष अभय दाढे यांनी सांगितलं.
या प्रसंगी बोलताना वी-स्कूलचे समूह संचालक प्रो. डॉ. उदय साळुंखे यांनी वी-स्कूलच्या भविष्यकालीन वाटचालीची दिशा स्पष्ट केली. ‘‘विद्यापीठाशी संलग्न अभ्यासक्रमांच्या संदर्भात वी-स्कूलला मिळालेल्या स्वायत्तेमुळे संस्थेतील शिक्षणाचा दर्जा आणि त्यात सातत्य राखण्यासाठी उपयोजित केलेल्या अनेकविध प्रणालीची गुणवत्ता यावर उत्कृष्टतेची मोहोर उमटली आहे.
पुढील पाच वर्षासाठी मिळालेल्या स्वायत्तेमुळे आम्हाला समाज, देश व जागतिक पातळीवरील अनेक गरजा तसेच उद्योग-व्यवसायांसमोर उभ्या राहणा-या अनेक आव्हानांमध्ये आपले योगदान अधिक प्रभावीपणे देणे शक्य होणार आहे.’’
वी-स्कूलसारख्या उत्कृष्टतेचा ध्यास घेतलेल्या शैक्षणिक संस्था स्वायत्ता मिळाल्यामुळे अधिक मोकळेपणाने कार्यरत होता येईल. तसंच विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांमध्ये वैविध्यपूर्ण, आधुनिक अध्यापन पद्धती आणि उपयोजन तंत्रांचा अंतर्भाव करून त्यांची व्याप्ती अधिक विस्तृत करता येईल.
विद्यार्थी हा वी-स्कूलच्या संपूर्ण शिक्षणप्रणालीचा केंद्रिबदू आहे. त्यांच्या क्षमता वृद्धिंगत करून कॉर्पोरेट क्षेत्रासाठी उत्तम व्यवस्थापक म्हणून विकसित करणे तसेच त्यांच्यातील उद्योजकतेच्या गुणांना पोषक वातावरण तयार करून त्यांना त्या मार्गावर जाण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या आमच्या प्रयत्नांना वी-स्कूलला स्वायत्ता मिळाल्यामुळे अधिक बळकटी येईल अशी माझी खात्री आहे, असंही प्रो. डॉ. उदय साळुंखे यांनी म्हटलं आहे.