गुहागर तालुक्यातील पांगारी हवेली येथील आडीभोईवाडी येथील सार्वजनिक विहिरीमध्ये पडलेल्या बिबटयाला वनविभागाच्या कर्मचा-यांनी सुरक्षितपणे बाहेर काढून त्याला जीवदान दिले.
गुहागर- गुहागर तालुक्यातील पांगारी हवेली येथील आडीभोईवाडी येथील सार्वजनिक विहिरीमध्ये पडलेल्या बिबटयाला वनविभागाच्या कर्मचा-यांनी सुरक्षितपणे बाहेर काढून त्याला जीवदान दिले. सुमारे सात ते आठ वर्षाच्या नर जातीच्या बिबटयाला वनविभागाच्या वतीने कोयना अभयारण्यात सोडून देण्यात आले.
बिबटया विहिरीत पडल्याचे समजताच त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली. चिपळूणचे परिक्षेत्र वनपाल बी.आर.पाटील, वनपाल लोखंडे, नाईक, यांच्यासह बिबटयाला पकडण्यासाठी संपूर्ण टीम घटनास्थळी पोहोचली.
तत्पूर्वी वनपाल किर यांनी सकाळी ११ वाजता कर्मचा-यांच्या मदतीने विहिरीमध्ये तराफा सोडून विहिरीतील बिबटयाचा जीव वाचवला. त्यानंतर काही कालावधीनंतर चिपळूणमधून आणलेल्या पिंजरा विहिरीमध्ये सोडून त्या बिबटयाला बाहेर काढण्यात यश आले. बिबटयाला कोयना येथील जंगलात सोडण्यात आल्याचे वनखात्याच्या वतीने सांगण्यात आले.