लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळावे यासाठी संयुक्त जनता दल मदतीला धावून आले आहे.
पाटणा- लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळावे यासाठी संयुक्त जनता दल मदतीला धावून आले आहे. लोकशाही व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी सक्षम असा विरोधी पक्ष हवा असे सांगत जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे.
लोकसभेत विरोध पक्षनेतेपद मिळवण्यासाठी सभागृहात १० टक्के सदस्य संख्या असायला हवी असा नियम आहे. सध्या लोकसभेत भाजपनंतर काँग्रेस दुस-या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेसचे ४४ खासदार आहेत. मात्र विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी ही संख्या पुरेशी नाही. ( जाणून घ्या – लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या )
केंद्रीय दक्षता आयोग, राष्ट्रीय मानवधिकार आयोग आणि लोकपाल या महत्त्वाच्या पक्षावरील व्यक्तींच्या नियुक्तीच्या दृष्टीने विरोधी पक्षनेतेपद महत्त्वाचे असल्याचे कुमार यांनी सांगितले.
बिहारमध्ये २०१०च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयूचे सरकार होते. विधानसभेत लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता पक्षाला १० टक्के जागा मिळाल्या नव्हत्या. तरीही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राष्ट्रीय जनता पक्षाला विरोधी पक्षनेतेपद दिले होते. अशी उदारता केंद्रातील भाजप सरकार दाखवणार नसल्याचे कुमार म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसने बिहारमधील जितन राम मांझी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा दिला होता.
दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर अण्णाद्रमुक, बिजू जनता दल, तृणमूल काँग्रेस हे पक्ष दावा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.