हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबरोबरच सभापती पदावरही दावा करणार आहे.
मुंबई – हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबरोबरच सभापती पदावरही दावा करणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली. विधानपरिषदेत राष्ट्रवादीची संख्या अधिक असल्याने दोन्ही पदांवर राष्ट्रवादीचा हक्क असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादी भवनमध्ये गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विधानसभेमध्ये राष्ट्रवादीची नक्की भूमिका काय हे स्पष्ट होत नसताना विधानपरिषदेत मात्र विरोधी पक्षनेतेपदाबरोबरच विधानपरिषद सभापतीपदावर दावा करण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने चालवली आहे. हिवाळी अधिवेशनात या दोन्ही पदांवर दावा केला जाणार आहे. विधानपरिषदेतील सध्याचे संख्याबळ पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक २८, काँग्रेसचे २१, भाजपा ९ तर शिवसेना ६ असे संख्याबळ आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला परिषदेतला सर्वात मोठा पक्ष म्हणून विरोधी पक्षनेतेपद मिळण्यास काही अडचण नाही, असेही तटकरे म्हणाले. तसाच दावा सभापतीपदावर असेल असेही तटकरे यांनी सांगितले. तटकरे स्वत: विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र सध्या आपण संघटनेची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे पक्ष यापुढे जो काही निर्णय घेईल, त्यानुसार काम करू असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दुष्काळी भागासाठी तातडीने मदत जाहीर करावी, दलितांवर होत असलेले अन्याय दूर करावेत, जवखेडा हत्याकांडातील आरोपींना तातडीने पकडले जावे आदी मागण्यांसाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. सभागृहातही हा विषय लावून धरू, असे ते म्हणाले.
मुस्लीम आरक्षण..
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम आरक्षणासाठीही सरकारने पावले उचलावीत. शिवाय ज्या पद्धतीने मराठा आरक्षणासाठी जी समिती स्थापन करण्यात आली, त्याचपद्धतीने मुस्लिम आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागावा. त्यासाठी मुस्लिम लोकप्रतिनिधींचा समितीत सहभाग करावा, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.