काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांची पुन्हा विधान परिषदेच्या सभापतीपदी बुधवारी निवड करण्यात आली.
मुंबई- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांची पुन्हा विधान परिषदेच्या सभापतीपदी बुधवारी निवड करण्यात आली. या पदासाठी देशमुख यांचा एकमेव अर्ज विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याकडे दाखल झाला. विरोधकांनीही देशमुख यांच्या निवडीला समर्थन दिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित होते. विधान परिषदेच्या गुरुवारी होणा-या एकदिवसीय विशेष अधिवेशनात त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली जाईल.
गेल्या १० वर्षात सभापती म्हणून देशमुख यांनी केलेले काम पाहता त्यांनाच पुन्हा संधी देण्याचा निर्णय काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. त्यांच्या नावावरून पक्षात कोणतेही मतभेद नव्हते, असेही त्यांनी सांगितले. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रयत्न केल्याचेही ते म्हणाले.
त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांशी चर्चा केली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, ही मुख्यमंत्र्यांनी केलेली विनंती मान्य केल्याचे भाजप नेते विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सभापती निवडीबरोबरच विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याचीही नियुक्ती केली जाणार आहे. या पदावर भाजपने तावडे यांनाच पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.