एखादा शिक्षक एक कलाकार आणि एक माणूस म्हणूनही सर्वाना आपलंसं करतो, तेव्हा त्या शिक्षकाबाबत सहका-यांना वाटणारा जिव्हाळा काही औरच असतो. सर जे.जे. उपयोजित कला महाविद्यालयाचे प्रा. लक्ष्मण नवरे यांचं अलीकडेच प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झालं. प्रा. नवरे यांनी आपल्याकडच्या अनेक उत्तम गुणांमुळे सहअध्यापक आणि विद्यार्थी सर्वाच्याच मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांच्यावरच्या प्रेमापोटी पाच सप्टेंबर या शिक्षकदिनानिमित्त ‘सर जे. जे. उपयोजित कला महाविद्यालया’च्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून ‘द ट्रिब्युट’ हे प्रा. नवरे यांच्या चित्रांचं प्रदर्शन आयोजित केलं आहे. त्या प्रदर्शनाचा हा फेरफटका..
‘एखादी कलाकृती त्या कलाकाराच्या आत्म्याची ओळख करून देते’, असं डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी म्हटलं आहे. प्रा. नवरे यांची चित्र पाहूनही त्यांच्यातल्या कलाकाराची आणि उत्तम माणसाची ओळख होते. सर जे.जे. महाविद्यालयातूनच त्यांनी आपलं चित्रकलेचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ए.एम.सी., ए.आय.एम. यांसारख्या वेगवेगळ्या जाहिरात कंपन्यांमध्ये व्हिज्युअलायजर आणि इलस्ट्रेटर म्हणून काम केल्यानंतर १९९७ साली सर जे.जे. उपयोजित कला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. महाविद्यालयातले एक अतिशय ‘विद्यार्थीप्रिय शिक्षक’ म्हणून त्यांची ओळख होती. रंगछटांमध्ये रमणा-या या शिक्षकांना कारकुनी कामांची रुक्षता नकोशी वाटणं स्वाभाविकच, पण प्रा. लक्ष्मण नवरे एक कलाशिक्षक म्हणून आपली जबाबदारी चोख बजावत असत.
एखाद्या सामान्य वस्तूचा असामान्य वापर करण्याची किमया कलाकार त्याच्या प्रतिभेतून सहज साधू शकतो. तुम्ही-आम्ही वापरत असलेल्या साध्या बॉलपेनचा वापर करून कॅनव्हासवर साकारलेले गणपती हा त्यांचा चित्रविशेष म्हणता येईल. वेगवेगळ्या रंगांच्या बॉलपेनने त्यांनी गणपतीची विविध रूपं कॅनव्हासवर उतरवली आहेत. केवळ बॉलपेनच्या सहाय्याने इतकं बारीक काम करणं सोपी गोष्ट नाही. मनुष्याच्या चिकाटीची कसोटी घेणा-या या चित्रप्रकारात फार लोक काम करत नाहीत. पण प्रा. नवरे यांची चिकाटी, सातत्य आणि अचाट मेहनत करण्याची तयारी हे गुण, त्यांची ही चित्र पाहिली की नक्कीच प्रत्ययाला येतात. छाया-प्रकाशाचा समतोल साधत, गणरायाच्या रूपातला गोडवा जपत, इतक्या बारीक माध्यमाचा वापर करून ही चित्रं काढली आहेत. प्रत्येक माध्यमाच्या काही मर्यादा असतात. ऑइल पेंट वाळायला बराच वेळ लागतो तर पेन्सिल स्केचेस काही काळाने पुसट होत जातात. बॉलपेन या माध्यमालाही काही मर्यादा आहेतच. थोडा वेळ झाला की बॉलपेनच्या निबच्या पुढे शाईचा थेंब जमा होतो. चित्र काढताना अयोग्य ठिकाणी उमटलेला हा शाईचा छोटा ठिपकासुद्धा त्या चित्रसौंदर्याचा भंग करू शकतो, पण प्रा. लक्ष्मण नवरे यांनी हेही भान जपलं.
कलाकाराला त्याच्या कामातून आनंद मिळत असेल तर तो रसिकांपर्यंत नक्कीच पोहोचतो. नवरेसरांची चित्र पाहताना आपल्याला याची अनुभूती येते. त्यांनी चित्रकलेला वाहून घेतलं होतं. त्यामुळे अगदी कठीण, वेळ घेणारं कामही त्यांनी तितकंच तन्मयतेने केलं. त्यांची ‘लॅण्डस्केप’ चित्रंसुद्धा मनाला भावणारी आहेत. त्यांनी काढलेली निसर्गचित्रं पाहून मनाला एक प्रकारची शांतता मिळते. महाविद्यालयाच्या परिसरातली इमारत, केरळचं सृष्टीसौंदर्य त्यांनी या चित्रांमध्ये दाखवलं आहे.
सर जे.जे. उपयोजित कला महाविद्यालयात प्रा. नवरे कम्प्युटर ग्राफिक्सचंही शिक्षण देत होते. पण तंत्रज्ञानाला सरावून त्यांनी हातातली जादू हरवू दिली नाही. या महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रो. जी. जी. वाघमारे म्हणाले, ‘प्रा. लक्ष्मण नवरे म्हणजे अडीअडचणीत कोणाच्याही मदतीला धावून जाणारा शिक्षक होता. एकदा मी त्यांना म्हटलं की, आपल्याकडे संगणक कक्ष सुरू केला आहे. त्याचा विद्यार्थ्यांसाठी कसा उपयोग करता येईल याचा विचार करा. त्यांनी लगेचच ते मनावर घेतलं आणि ‘कम्प्युटर ग्राफिक्स’बाबत विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. संस्थेची प्रमाणपत्र, आमंत्रणपत्रिका यांचं आरेखनही तेच करत असत. त्यांची पोकळी भरून निघणं शक्य नाही. म्हणूनच त्यांच्यासारख्या उत्तम शिक्षकाच्या प्रेमापोटी इतर सर्व शिक्षकांनी त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन आयोजित करण्याचं ठरवलं.’
अनेकदा कर्तव्यपूर्तीला महत्त्व देत असताना आपल्या मनाची इच्छापूर्ती करायची राहून जाते. चित्रकला महाविद्यालयात कलाशिक्षक वेगवेगळे विषय शिकवतात, पण हे विषय शिकवत असताना तासन्तास आपल्याला आवडेल ते चित्र काढावं, शिक्षकाच्या भूमिकेला थोडय़ा वेळाकरता बाजूला सारून आपल्यातल्या कलाकारासाठी काही वेळ काढावा, असं अनेकदा या शिक्षकांना वाटतं. मग अशा वेळी प्रो. लक्ष्मण नवरेंसारखा एखादा कलाकार कधी वाटलं तर ब्रश हाती घेऊन अब्स्ट्रॅक्ट पेंटिंग करू लागतो. तर कधी बसल्याबसल्या समोरच्या व्यक्तीचं वास्तवदर्शी पोट्र्रेट तयार करतो. या वेळी रसिकाच्या आनंदापेक्षा आपल्यातल्या कलाकाराला त्याची स्वत:ची जागा, वेळ देणं, त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी ‘कॅनव्हास’ उपलब्ध करून देणं जास्त महत्त्वाचं असतं. प्रा. नवरे यांनी हेही अनुभवलं. त्यांचे सहअध्यापक, त्यांच्यासोबत अनेक र्वष काम केलेले त्यांचे मित्र सांगत होते, ‘प्रा. नवरे हे शिक्षक म्हणून मुरलेल्या लोणच्यासारखे होते. अनेक र्वष जे.जे.मध्ये काम केल्याने संपूर्ण वास्तूशी, विद्यार्थ्यांशी ते एकरूप झाले होते. कुठलंही काम भरपूर मेहनत घेऊन, आपलं पूर्ण कसब पणाला लावूनच ते हे काम करत असत. सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन असो किंवा सहलींचं ते उत्साहाने सगळ्याच उपक्रमांमध्ये भाग घ्यायचे. शिक्षकाबरोबरच त्यांच्यात एक कार्यकर्ताही दडलेला होता. ‘सामंजस्य’ हा त्यांचा सगळ्यात मोठा गुण होता. एका उत्तम शिक्षकाचे सगळे गुण त्यांच्यात होते. सातत्य, एकाग्रता, चिकाटी त्यांच्या चित्रांतून दिसून येते. त्यांचं कौशल्य वाखाणण्याजोगं आहे. त्याचं काम, कामातून दिसणारे त्यांचे गुण शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी घेण्यासारखे आहेत.’
प्रा. लक्ष्मण नवरे यांची उपयोजित कलेची कामं लोकांसमोर आली नाहीत. उत्तम प्रतिभाशक्ती आणि क्षमता असूनही कधीही अहंभाव न बाळगणारा हा कलाकार कलेच्या क्षेत्रात उत्तम काम करू शकला असता. पण प्रा. लक्ष्मण नवरे यांचा कॅनव्हास कोराच राहिल्याची हुरहूर संपूर्ण जे.जे. परिवाराला लागून राहिली आहे. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी यासाठी प्रा. लक्ष्मण नवरे यांनी काढलेली चित्रं विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. http://www.cobble-street.com या पोर्टलवर चित्रप्रेमी ही चित्रं खरेदी करू शकतात. ११ सप्टेंबपर्यंत सर जे.जे. उपयोजित कला महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी ११ ते चार या वेळेत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले राहील.