लंडन – भारतीय बँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावून पसार झालेल्या विजय मल्ल्याला आर्थर रोड कारागृहात वेगळ्या कोठडीत ठेवण्यात येईल, अशी माहिती भारत सरकारने लंडन न्यायालयात दिली आहे. तिथे मल्ल्याला वेस्टर्न पद्धतीचं टॉयलेट दिले जाईल, तसंच स्वच्छता ठेवली जाईल याची काळजी घेण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
१२ सप्टेंबरला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. याआधीही प्रत्यार्पणाच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी आर्थर रोड कारागृहातील बराक क्रमांक १२ मध्ये नैसर्गिक उजेड आणि वैद्यकीय सुविधेवरून चिंता व्यक्त केली होती. विजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण केल्यास, त्याला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार आहे. भारताने न्यायालयात कारागृहाचे फोटो सादर केले होते. मात्र, त्यावरून आपण अंदाज बांधू शकत नसल्याचे सांगत न्यायाधीशांनी व्हीडिओ मागितला आहे.