शिवा थापा आणि मनोज कुमारपाठोपाठ विकास मलिक (६० किलो गट), सुमीत संगवान (८१ किलो गट) आणि सतीश कुमारने (९१ किलोवरील गट) जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
अल्माटी (कझाकस्तान)- शिवा थापा आणि मनोज कुमारपाठोपाठ विकास मलिक (६० किलो गट), सुमीत संगवान (८१ किलो गट) आणि सतीश कुमारने (९१ किलोवरील गट) जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. पाच बॉक्सर्सनी उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मंगळवारचा दिवस भारतासाठी आनंदाचा ठरला. विकास, सुमीत आणि सतीशने विजय मिळवले. दोन वर्षापूर्वी (२०११) अझरबैजानमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत भारताच्या चार बॉक्सर्सनी उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. त्यानंतरची सरस आणि ऐतिहासिक कामगिरी करण्यात भारताला यावेळी यश आले.
विकासने मंगळवारी विजयी सुरुवात केली. त्याने २००८ युरोपियन स्पर्धेतील रौप्यपदक विजेता आणि पाचवा सीडेड मिक्लोस वार्गाला हरवले. पहिल्या फेरीत विकास पिछाडीवर होता. मात्र पुढील दोन फे-यांमध्ये खेळ उंचावताना विकासने बाजी मारली. उपांत्यपूर्व फेरीत त्याच्यासमोर चौथा सीडेड ब्राझीलचा रॉबसन काँसीकॅओचे आव्हान आहे. २० वर्षीय ऑलिंपियन सुमीतने बेलारुसच्या आठव्या सीडेड सियार्ही नोविकाउवर ३-० असा एकतर्फी विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत त्याची गाठ लंडन ऑलिंपिकमधील रौप्यपदक विजेता, अव्वल सीडेड कझाकस्तानचा अडिबेक नियाझीमबेटोवशी पडेल. मागील खेपेस रौप्यपदक विजेता अडिबेक यावेळी ‘फेवरिट’ आहे.
बेलारूसच्या यान सुडझिलोउस्कीवर ३-० अशी मात करण्यात सतीशलाही फार प्रयास पडले नाहीत. मात्र विकास आणि सुमीतप्रमाणे उपांत्यपूर्व फेरीत त्याच्यासमोर कडवे आव्हान आहे. अंतिम चार जणांमध्ये स्थान मिळवण्यासाठी सतीशला लंडन ऑलिंपिकमधील कांस्यपदक विजेता, दुसरा सीडेड कझाकस्तानचा इवान डिचकोशी दोन हात करावे लागतील.
अव्वल बॉक्सर विजेंदर सिंग (२००९) आणि विकास कृष्णनच्या (२०११) रूपाने जागतिक स्पर्धेत भारताला आजवर केवळ दोनच पदके मिळवता आलीत. यावेळी त्यात भर पडते का, याची उत्सुकता लागून राहिली आहे.