वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणा-या वाहन चालकांचे प्रगतिपुस्तक बनवण्याबाबत विचार करत आहे. त्यामुळे भविष्यात वाहतूक पोलिस गुणपत्रिका बनवताना दिसल्यास आश्चर्यचकीत होऊ नका.
मुंबई – वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणा-या वाहन चालकांचे प्रगतिपुस्तक बनवण्याबाबत विचार करत आहे. त्यामुळे भविष्यात वाहतूक पोलिस गुणपत्रिका बनवताना दिसल्यास आश्चर्यचकीत होऊ नका. राज्य पोलिस दलातील वरिष्ठ अधिका-यांची समिती वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात गुणपद्धती अवलंब करण्याचा विचार करत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव सध्या अंतिम टप्प्यात असून, तो मंजूर झाल्यास प्रतिकूल गुणांनुसार चालकाचा परवाना रद्द करण्यापासून अगदी वाहनांची नोंदणी रद्द करण्यापर्यंत कारवाई करणे शक्य होणार आहे.
मोटर वाहन कायदा १९८८ नुसार चालक परवाना देणा-या प्राधिकरणालाच चालकाचा परवाना अपात्र अथवा रद्द करण्याचे अधिकार आहेत. पण अपात्रतेचा कालावधी किती असावा, दंडाची रक्कम किती असावी तसेच अपात्रतेनंतर परवाना रद्द करण्याबाबत निश्चित कार्यपद्धती नसल्यामुळे कारवाई करताना अडचणी निर्माण होत होत्या. तसेच सर्व वाहनचालकांवरील कारवाईत एकसमानता यावी, यासाठी राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक महामार्ग) विजय कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती.
ही समिती सध्या प्रतिकूल गुण पद्धतीनुसार चालकांवर कारवाई करण्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करीत आहे. हा प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास वाहतुकींचे नियम पायदळी तुडवणा-यांवर अधिक सक्षमपणे कारवाई करणे सोपे होणार आहे.
[poll id=”445″]
या प्रस्तावानुसार झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल जंपिंग अशा छोटय़ा नियमभंगासाठी एक गुण, वेग मर्यादेसाठी ३ गुण, धोकादायकरीत्या वाहन चालवल्यास ५ गुण व मद्यप्राशन करून गाडी चालवल्यास १० गुण संबंधित चालकाच्या नावावर जमा होतील. संगणकाच्या माध्यामातून या माहितीचे संकलन करून, त्यानंतर एखाद्या चालकाने गुणांची सीमा ओलांडल्यास त्याचा परवाना अपात्र अथवा रद्द करण्यापासून अगदी वाहनाची नोंदणी रद्द करण्यापर्यंतची कारवाई वाहनचालकांवर करता येणार आहे.
परवाना रद्द झाल्यानंतर सहा महिन्यांशिवाय नवीन परवान्यासाठी अर्ज करणे या प्रस्तावानुसार शक्य होणार नाही. तसेच चालक परवान्यासाठी अर्ज करणा-या व्यक्तीला मोटर वाहन स्कूलचे एक महिन्यांचे विशेष प्रशिक्षण घेणे, आरटीओच्या उच्चस्तरीय परीक्षा देणे, वाहतूक पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅफिक वॉर्डन म्हणून दररोज दोन सत्रात प्रत्येकी दोन तास वाहतूक देखरेखीचे काम करणे बंधनकारक ठरणार आहे.
तसेच सध्याच्या शुल्काच्या चारपट वाढीव शुल्क भरून परवानासाठी अर्ज करता येऊ शकेल. हा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. वाहतूक सुरळीत चालण्यासाठी शहरात लवकरच २२५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यातील १२ सीसीटीव्ही कॅमेरे हे पूर्व मुक्त मार्गावर बसविण्यात येणार आहेत. या मार्गावरील दोन्ही बोगद्यांच्या दोन्ही बाजूंना, तसेच अपघाती स्थळांवर हे सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याचे सहपोलिस आयुक्त (वाहतुक) विवेक फणसळकर यांनी सांगितले. याशिवाय वाहतूक नियमांचे गांभीर्य चालकांना पटवून देण्यासाठी वाहतूक पोलिस मुंबईत एक मॉडेल जंक्शन उभारणार आहेत.
नियमभंगानुसार प्रतिकूल गुण पद्धत
कलम १७७ तसेच इतर वाहतूक नियमभंग- झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल जंम्पींग, नो पार्किंग, लेन कटींग, फॅन्सी नंबर प्लेट, विना हेल्मेट, विना सीट बेल्ट, विना लाईट, ट्रीपल सिट,
नो एन्ट्री- १गुण
कलम १८३ – वेग मर्यादेचे उल्लंघन- ३ गुण
कलम १८४ – धोकादायकरित्या वाहन चालवणे – ५ गुण
कलम १८५ – मद्यपान करून
वाहन चालवणे – १० गुण
प्रतिकूल गुणांनुसार प्रस्तावित कारवाई
१० प्रतिकूल गुण : तीन महिन्यांसाठी परवाना अपात्र
१५ प्रतिकूल गुण : ६ महिन्यांसाठी परवाना अपात्र
२० पेक्षा जास्त प्रतिकूल गुण : परवाना रद्द / परमिट रद्द
३० पेक्षा जास्त प्रतिकूल गुण : परमिट रद्द
४० पेक्षा जास्त प्रतिकूल गुण : ३ महिन्यांसाठी वाहनाची नोंदणी अपात्र ठरविणे
५० पेक्षा जास्त प्रतिकूल गुण : नोंदणी रद्द करणे