मतदानाच्या पूर्वसंध्येला उत्तर प्रदेश पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या पथकाने रविवारी वाराणसीत भाजपच्या कार्यालयावर छापा घातला.
वाराणसी- मतदानाच्या पूर्वसंध्येला उत्तर प्रदेश पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या पथकाने रविवारी वाराणसीत भाजपच्या कार्यालयावर छापा घातला. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, आपचे नेते अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे अजय राय हे येथून निवडणूक लढवित आहेत.
वाराणसीमधील प्रचार शनिवारी सायंकाळी संपलेला असताना रविवारी निवडणूक आयोगाच्या पथकाने भाजपच्या वाराणसीमधील सिग्रा येथील कार्यालयावर छापा घातला. या छाप्यात टी शर्ट, प्रसिद्धी पत्रक, बिल्ले आणि अन्य प्रचारसाहित्य जप्त करण्यात आले आहे.
प्रचाराची मुदत संपलेली असतानाही हे साहित्य वाटण्याचा भाजपचा प्रयत्न होता, असे आयोगाचे म्हणणे आहे. तर हे साहित्य प्रचारासाठी वापरण्यात आले नसून ते प्रचार संपला तेव्हा उरलेले असल्याचे भाजपच्या नेत्यांनी सांगितले.