अमेरिकेत ओक्लाहामा येथे गेल्या महिन्यात आलेल्या महाभयंकर वादळामध्ये मोठया प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी तर झाली होतीच. पण या वादळांची मालिका सुरूच असून गेल्या आठवडयात आलेल्या आणखी एका वादळात अशा प्रकारच्या वादळांचा अभ्यास करणा-या तीन संशोधकांचा मृत्यू झाला.
अमेरिकेत ओक्लाहामा येथे गेल्या महिन्यात आलेल्या महाभयंकर वादळामध्ये मोठया प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी तर झाली होतीच. पण या वादळांची मालिका सुरूच असून गेल्या आठवडयात आलेल्या आणखी एका वादळात अशा प्रकारच्या वादळांचा अभ्यास करणा-या तीन संशोधकांचा मृत्यू झाला. अमेरिकेत एका भागातून दुस-या भागात वा-याच्या भोव-यांसारखी फिरत जाणारी (ट्विस्टर) वादळे मोठया प्रमाणावर होत असतात. या वादळांचा गाडी किंवा इतर वाहनांनी पाठलाग करून त्याबाबत संशोधन केले जाते. अशा संशोधकांना ‘स्टॉर्म चेसर्स’ म्हणतात.
ओक्लाहामा येथे झालेल्या वादळाच्या वेळी टीम समारस, त्यांचा मुलगा पॉल आणि कार्ल यंग हे तीन संशोधक मरण पावले. त्यांच्या मृत्यूमुळे अमेरिकेतील हवामान विभागाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया संशोधकांनी व्यक्त केली आहे. ‘ट्विस्टेक्स’ नावाच्या वादळांच्या प्रकल्पावर हे संशोधक काम करत होते. या प्रकल्पाच्या फेसबुक पेजवर त्यांच्या मृत्यूचे वृत्त देण्यात आले आहे. मात्र, ओक्लाहामाच्या कॅनेडियन काउंटीचे ‘अंडरशेरिफ’ ख्रिस वेस्ट यांनी त्यांची नावे जाहीर करण्यास नकार दिला. या वादळात तीन स्टॉर्म चेसर्सचा समावेश होता, इतकीच माहिती त्यांनी दिली आहे.
शुक्रवारी आलेल्या वादळाच्या वेळी जोरदार वारे वाहत होते, मुसळधार पाऊस आणि गारांचा वर्षाव होत होता. त्यामुळे जीवितहानीमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली. हे संशोधक ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीचे अवशेष वादळ झालेल्या ठिकाणापासून सुमारे एक किलोमीटरवर आढळले आहेत. या वादळाने दिलेला तडाखा इतका मोठा होता की त्या गाडीचा ओळखता येणार नाही इतक्या मोठया प्रमाणात चुराडा झाला आहे. समारस हे जगातील सर्वोत्तम स्टॉर्म चेसर्सपैकी एक होते, असे नॅशनल जिऑग्राफिकने म्हटले आहे. ५५ वर्षाच्या या संशोधकाने या संशोधनामध्ये दोन दशकांपासून स्वत:ला झोकून दिले होते.
‘द विझार्ड ऑफ ओझ’ हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये अशा प्रकारच्या वादळांबद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि ते या संशोधनाकडे वळले. समारस यांच्या उपकरणांच्या माध्यमातून या वादळांच्या अंतर्भागात कोणत्या घडामोडी घडतात याची माहिती पहिल्यांदाच उपलब्ध झाल्याचे सांगितले जाते. त्यांचे आवडीचे काम करत असताना त्यांचा मृत्यू झाला, असे नॅशनल जिऑग्राफिकने त्यांना आदरांजली वाहताना सांगितले आहे.