वांद्रय़ातील सरकारी वसाहतीत असलेल्या सरकारी दवाखान्यात एकही त्वचा रोग डॉक्टर उपलब्ध नसून काही महिन्यांपूर्वी येथे चालविण्यात येणारी त्वचारोग ओपीडी देखील गेल्या चार महिन्यांपासून बंद असल्याची बाब उघड झाली आहे.
मुंबई- वांद्रय़ातील सरकारी वसाहतीत असलेल्या सरकारी दवाखान्यात एकही त्वचा रोग डॉक्टर उपलब्ध नसून काही महिन्यांपूर्वी येथे चालविण्यात येणारी त्वचारोग ओपीडी देखील गेल्या चार महिन्यांपासून बंद असल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे येथे येणा-या हजारो त्वचारोग रुग्णांची परवड होत असून कर्मचारी आणि बाहय़ रुग्णांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वांद्रे पूर्व सरकारी वसाहतीत शासनाचे एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. येथील शासकीय अधिकारी आणि कर्मचा-यांसाठी खास हे आरोग्य केंद्र बांधण्यात आले होते. मात्र वांद्रे-खार परिसरात एकही पालिका रुग्णालय नसल्यामुळे हजारो स्थानिक नागरिकांना येथील ओपीडीअंतर्गत उपचार घेता येतात. या केंद्राच्या निर्मितीपासून येथे प्रसूती केंद्र आणि ओपीडी चालविण्यात येते. त्यासाठी एकूण १३ डॉक्टरांची पदे मान्य करण्यात आली आहेत.
मात्र या १३ मध्ये एकही त्वचारोग डॉक्टर नाही. जे.जे. रुग्णालयातून शिकाऊ डॉक्टर येथे सरावासाठी येत असतात. त्यातच त्वचा रोग रुग्णांसाठी काही महिन्यांपूर्वी महिन्यातील दोन शनिवारी ओपीडी चालविण्यात येत होती. या ओपीडीस स्थानिकांचा मोठा प्रतिसाद लाभला होता. असे असताना ही ओपीडी गेल्या चार महिन्यांपासून आरोग्य केंद्र प्रशासनाने बंद केली आहे. त्यामुळे येथे येणा-या हजारो त्वचारोग रुग्णांचे हाल होत असून त्यांची आरोग्य केंद्रात येण्याची फेरी देखील व्यर्थ ठरत आहे. कोणतेही कारण न देता बंद करण्यात आलेल्या ओपीडीमुळे सरकरी वसाहतीमधील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्वचारोगाचे डॉक्टरच मिळत नाहीत
सरकारी वसाहतीमधील आरोग्य केंद्रात त्वचारोग डॉक्टर मिळावेत म्हणून आम्ही अनेक वेळा आमच्या मुख्य कार्यालय असलेल्या जे.जे. रुग्णालयात पत्रव्यवहार केला आहे. मात्र तेथून केवळ दोन दिवस आम्हाला शिकाऊ डॉक्टर विद्यार्थी उपलब्ध होत होते. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे आता ते येत नाहीत. शिवाय जे.जे.मध्येही त्वचारोग डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यामुळेच आम्ही ही ओपीडी बंद ठेवली असल्याचे सरकारी वसाहत प्राथमिक आरोग्य केद्रांच्या प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी आडे यांनी दै. प्रहारला सांगितले.