वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी महिला बचत गटांना बिनव्याजी कर्ज देण्यात येईल, अशी घोषणा वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान यांनी येथे केली.
मुंबई – मुंबईतील महिला बचत गटांप्रमाणेच राज्यातील महिला बचत गटांनी वस्त्रोद्योग क्षेत्रात यायला हवे. वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी महिला बचत गटांना बिनव्याजी कर्ज देण्यात येईल, अशी घोषणा वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान यांनी येथे केली.
अल्पसंख्याक विकास विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने अल्पसंख्याक महिला बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, या वेळी ते बोलत होते. या मेळाव्याला महिला आणि बालविकास मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री फौजिया खान यांच्यासह बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महामंडळाच्या वतीने राबवण्यात येणा-या अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रमास अल्पसंख्याक विकास विभागामार्फत १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी अधिक निधीची गरज भासल्यास तो वाढवून देण्यात येईल. राज्यातील अल्पसंख्याक बहुल क्षेत्रांमध्ये अल्पसंख्याक महिलांचे बचत गट स्थापन करून त्यांचे फेडरेशन केले जाणार आहे. त्याद्वारे सुमारे २५ हजार अल्पसंख्याक महिलांना विविध प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ दिला जाईल. अल्पसंख्याक समाजासाठी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत आयटीआयच्या माध्यमातून निशु:ल्क अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यात अल्पसंख्याक मुलींसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अल्पसंख्याक मुलींनी याचा लाभ घेऊन आपला विकास साधावा, असे आवाहन नसीम खान यांनी केले.