वसई, नालासोपारा व विरार शहरांतील नागरिकांच्या जीवाशी खेळ करत ५१ बनावट डॉक्टरांनी वैद्यक धंदा मांडल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
विरार- वसई, नालासोपारा व विरार शहरांतील नागरिकांच्या जीवाशी खेळ करत ५१ बनावट डॉक्टरांनी वैद्यक धंदा मांडल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शहरातील बनावट डॉक्टर आणि नियमबाह्य रुग्णालयांविरोधात पालिका प्रशासनाने राबवलेल्या विशेष मोहिमेत ५१ डॉक्टर बोगस असल्याचे आढळले. यात सर्वाधिक १९ बोगस डॉक्टर नालासोपा-यातील धानिव बाग परिसरात आढळले आहेत.
दवाखान्यांच्या फलकावरील नावापुढे ‘डीयूएमएम’, ‘एव्हीव्हीएएम’, ‘एएचएमआर’, ‘एलसीईएम’ अशी इंग्रजी आद्याक्षरे जोडून रुग्णांची फसवणूक करण्याचा व्यवसाय हे डॉक्टर करत आहेत. त्यामुळे या सर्वांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी दिले आहेत.
शहरातील सर्व डॉक्टरांना आपापल्या पदव्या सादर करून पालिकेकडे नोंदणी करण्यास सांगण्यात आले होते. या विशेष मोहिमेत रुग्णालय, पॅथॉलॉजी लॅब, खासगी क्लिनिक आणि डॉक्टरांची कागदपत्रे व पदव्यांची पडताळणी करण्यात आली. त्यात शहरात ५१ बोगस डॉक्टर आढळले. त्यांच्याकडे कोणत्याही नामांकित विद्यापीठाची पदवी नव्हती. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडेही त्यांची नोंद नव्हती. त्यांनी सादर केलेल्या या सर्व पदव्या बोगस असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. अनुपमा राणे यांनी सांगितले. या सर्व डॉक्टरांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी दिले आहेत.
या बोगस डॉक्टरांनी आपापले दुकान थाटून त्यावर विविध पदव्या लटकवल्या आहेत. डीयूएमएस, एव्हीव्हीएएम, एएचएमआर, एलसीईएम, बीआयएमएस अशी वाटेल ती आद्याक्षरे जोडून पदव्या तयार करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारचा कुठला अभ्यासक्रम आणि पदव्या नसून; केवळ गरीब जनतेची फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे. या बोगस डॉक्टरांकडे जाऊन उपचार केल्यास जीविताला धोका उत्पन्न होऊ शकतो, असे डॉ. राणे यांनी सांगितले.
दरम्यान, ‘आम्ही सर्व बोगस डॉक्टरांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचे दवाखाने सील करणार आहोत, मात्र नागरिकांनीही अशा डॉक्टरांपासून सावध राहावे व शक्यतो पालिकेच्या वैद्यकीय सुविधांचाच लाभ घ्यावा,’ असे आवाहन पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी केले आहे.