शिवाजी पार्क मैदानातील कूपनलिका जिवंत ठेवण्यासाठी वर्षा जलसंचयन प्रकल्प (रेन वॉटर हार्वेस्टिंग) राबवण्याच्या मनसेच्या इराद्यावर महापालिकेने पाणी फेरण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई- शिवाजी पार्क मैदानातील कूपनलिका जिवंत ठेवण्यासाठी वर्षा जलसंचयन प्रकल्प (रेन वॉटर हार्वेस्टिंग) राबवण्याच्या मनसेच्या इराद्यावर महापालिकेने पाणी फेरण्यास सुरुवात केली आहे. शिवाजी पार्क सीआरझेड कायद्याच्या कक्षेत येत असल्याने तेथे रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवता येणार नाही, असा शेरा महापालिकेच्या विकास नियोजन विभागाने दिला आहे. त्यामुळे आक्रमक भूमिका घेत मनसेने हा पट्टा सीआरझेडमध्ये येत असेल, तर त्यातील सर्व बांधकामे अनधिकृत ठरवावी, आयुक्तांवर एमआरटीपीन्वये कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान शिवसेनेने मात्र, हा प्रकल्प महापालिका राबवेल, पुढील आठवडय़ात बैठक घेऊन निर्णय घेऊ, अशी सावध भूमिका घेतली आहे.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विहिरींची स्वच्छता करून त्या ताब्यात घेण्याबाबत माजी नगरसेवक भास्कर खुरसुंगे यांच्या ठरावाच्या सूचनेचा प्रस्ताव आला होता. मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे ही बाब मांडली.
45 दिवसांपासून शिवाजी पार्क मैदानात वर्षा जलसंचयन प्रकल्प राबवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. महापालिकेने एक तर स्वत: हा प्रकल्प करावा किंवा नगरसेवक निधीतून तो करायला आपल्याला सांगावे. आपण तो करायला किंवा खासगी सहभागातून व्हावा, यासाठी पाठपुरावा करत आहोत. याबाबत जी/उत्तर प्रभागाने विकास नियोजन विभागाचा (डेव्हलपमेंट प्लॅन) शेरा आणण्यास सांगितले. ‘डीपी’चा शेरा मिळवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी हा भाग सीआरझेडमध्ये येतो, त्यामुळे प्रकल्प राबवता येणार नाही, असे सांगितल्याची माहिती देऊन देशपांडे म्हणाले की, ‘‘जर हा पट्टा सीआरझेडमध्ये मोडत असेल तर याठिकाणी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र कलादालन, महात्मा गांधी तरणतलाव, शिवाजी पार्कमधील शिल्पांचे काम कसे करण्यात आले? त्यांच्या आड हा नियम आला नाही. मग वर्षा जलसंचयन प्रकल्पाला तो कसा लागू होतो? हा नियम न पाळता जर आधी प्रकल्प राबवण्यात आले असतील, तर अनधिकृत बांधकामे केली, म्हणून आयुक्तांवरच एमआरटीपीअंतर्गत गुन्हा दाखल करा.’’ यावर स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी, तेथे वर्षा जलसंचयन प्रकल्प मंजूर झाला आहे. तीन कूपनलिका खोदण्यात आल्याही आहेत. पण पुढे सीआरझेडचा नियम दाखवण्यात आला. त्यामुळे तो रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात आपल्या दालनात बैठक घेऊन निर्णय घेऊ. स्थानिक नगरसेवक म्हणून तुम्हालाही बोलावू, असे देशपांडे यांना सांगितले. तरीही मनसेच्या नगरसेवकांचा त्रागा सुरूच होता.