काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन.डी.तिवारी वयाच्या ८८ व्या वर्षी विवाहाच्या बोहल्यावर चढले आहेत.
नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन.डी.तिवारी वयाच्या ८८ व्या वर्षी विवाहाच्या बोहल्यावर चढले आहेत. ते गुरुवारी सकाळी उज्वला शर्मा यांच्याशी विवाहबध्द झाले. अलीकडेच त्यांनी दीर्घ न्यायालयीन लढाईनंतर उज्वला शर्मा यांचा मुलगा रोहित शेखर (३२) आपलाच मुलगा असल्याचे जाहीररित्या मान्य केले होते.
एन.डी.तिवारींनी पितृत्व मान्य करावे यासाठी रोहित शेखरने त्यांना न्यायालयात खेचले होते. न्यायालयाच्या आदेशाने तिवारी यांचे डीएनए नमुने चाचणीसाठी घेण्यात आले.
डीएनए चाचणीवरुन रोहित शेखर हा तिवारींचाच मुलगा असल्याचे सिध्द होते असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर मार्च महिन्यात तिवारींनी शेखर आपलाच मुलगा असल्याचे जाहीरपणे कबूल केले.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे दुसरे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी वृत्तनिवेदिका अमृता राय सोबतच्या प्रेमसंबंधांची कबुली दिली होती. लवकरच आपण विवाहाच्या बंधनात अडकणार असल्याचे त्यांनीही जाहीर केले आहे.
[EPSB]
पत्रकार अमृता राय यांच्याशी आपले संबंध- दिग्विजय सिंग
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी पत्रकार अमृता राय यांच्याशी संबंध असल्याचे जाहीर केले आहे.
[/EPSB]