जिल्हा परिषदेच्या कृषी सभापतींनी मेळघाटात ठेवलेल्या वनभोजनाच्या कार्यक्रमात मधमाश्यांनी हल्ला केल
अमरावती- जिल्हा परिषदेच्या कृषी सभापतींनी मेळघाटात ठेवलेल्या वनभोजनाच्या कार्यक्रमात मधमाश्यांनी हल्ला केला. यात मेळघाटचे आमदार केवलराम काळे बचावले. परंतु त्यांच्या स्वीय सहाय्यकासह जवळपास शंभरावर लोकांना मधमाश्यांनी चावा घेतला.
जि. प. कृषी सभापती महेंद्रसिंग गलवार यांनी सेमाडोहनजीक भुमका बाबा मंदिराजवळ वनभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. अन्नपदार्थाचा खमंग सुगंध परिसरात दरवळला होता. मेळघाटचे आमदार काळे व काही सहकारी जेवण करून जामला गावाकडे निघाले आणि त्याच वेळात जेवणासाठी बसलेल्या सदस्यांवर अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. यात सर्वत्र पळापळ सुरू झाली. ताटावरून उठून मिळेल त्या दिशेने आलेले पाहुणे हाताचा पंखा करून पळत सुटले.
पाहुण्यांची व्यवस्था सांभाळणारे काँग्रेसचे सचिव श्रीकृष्ण सगणे, अमोल बोरेकर, राहुल येवले, स्वीय सहाय्यक उत्तमराव मोडक, पुण्याकाका येवले, अरविंद येवले, कालू ठाकूर, देवीदास कोगे असे शंभरावर जखमी झाले आहेत. घटनास्थळी दीडेशवर चपलांचा ढिगारा पडून होता. उंच टेकडीवर, झुडपात ज्या ठिकाणी पळत होतो तेथे मधमाश्या दंश करीत असल्याचे दंश झालेले नागरिक सांगत होते. खुद्द सभापती महेंद्र गलवार झोपडीत जाऊन लपले. हाताजवळ दोन ब्लँकेट त्यांनी ठेवले होते. आ. काळेंच्या गाडीचा चालक विनोद दाभाडकरवरसुद्धा मधमाश्यांनी हल्ला केला.