लोणावळा लोकलमध्ये मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली.
पुणे- पुणे-लोणावळा लोकलमध्ये मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली. घटनास्थळी सीआरपीएफ जवानांसह, पोलिस आणि बॉम्बशोधक पथकाला त्वरित पाचारण करण्यात आले. मात्र, ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. मात्र खडकीकरांनी सुमारे तासभर बॉम्बचा थरार अनुभवला.
रेल्वे प्रशासन अधिकारी वाय.के. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस नियंत्रण कक्षाकडे ‘पुणे रेल्वेस्थानकामधून नुकत्याच निघालेल्या लोकलमध्ये बॉम्ब आहे’ असा दूरध्वनी आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे रेल्वे स्थानकावर कळवण्यात आले. तेव्हा 11 वाजून 55 मिनिटांची पुणे-लोणावळा लोकल निघाली होती. 12 वाजून 12 मिनिटांनी ही लोकल खडकी रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली आणि प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. सीआरपीएफ जवानांच्या पथकाबरोबरच श्वानपथक, बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकांनी तपास केला असता या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यावर एक वाजून पाच मिनिटांनी ही लोकल लोणावळ्याकडे मार्गस्थ झाली. मात्र, सुमारे तासभर रंगलेल्या या बॉम्ब नाटय़ामुळे प्रवास्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. सुदैवाने या वेळात मुंबईकडे जाणारी कोणतीही मुख्य रेल्वे नव्हती. त्यामुळे मोठी रेल्वे वाहतूक कोंडी टळली.
तो फोन तळेगाव दाभाडेमधील..
पुणे- लोणावळा लोकलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा दूरध्वनी पोलिस नियंत्रण कक्षाकडे दुपारी बाराच्या आला होता. त्यानंतर मध्य रेल्वे पोलिस प्रशासनाला बॉम्बबाबत कळविण्यात आले. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात आली. बॉम्ब ठेवल्याची अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यावर फोन ज्या मोबाईलवरून आला तो ट्रेस करण्यात आला. तो मोबाईल क्रमांक तळेगाव दाभाडे येथील असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे महामार्ग पोलिस निरिक्षक महेंद्र रोकडे यांनी सांगितले.